भाजपने लॉकडाऊनच्या संधीत सरकारे पाडली : नाना पटोले

नाना पटोले www.pudhari.news

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कोरोनाची दुसरी लाट आली. त्यावेळी पवित्र गंगा नदीत अनेक मृतदेह तरंगत होते, असा अहवाल केंद्रीय समितीने दिलेला आहे. कोरोनाच्या लाटेत केंद्र सरकारने कडक लॉकडाऊन देशावर लादले. या काळात सर्वांना दिवे पेटवायला लावले आणि त्याच संधीचा फायदा घेत केंद्र सरकारने कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र या राज्यांतील सरकारे पाडली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या वतीने आयोजित शिबिरासाठी नाशिकमध्ये आलेल्या पटोले यांनी विविध आरोप करीत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

यावेळी ते म्हणाले, नोटाबंदीपूर्वी सांगितले जात होते की, अनेक श्रीमंतांचे पैसे परदेशात आहेत. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील.

एकाचेही काळे धन सापडले नाही आणि कोणाच्या खात्यात 15 लाखही जमा झाले नाहीत. उलट नोटाबंदी करून मोठा भ—ष्टाचार करण्यात आला. या देशात भय आणि भ—ष्टाचार यावर लोकशाही विकत घेतली जात आहे, असाही आरोप त्यांनी केला. संविधानिक व्यवस्था केंद्र सरकार संपवायला निघाले आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश माध्यमांसमोर आले आणि आम्हाला वाचवा, असे सांगू लागले. याचा अर्थ काय? ही लोकशाही पद्धत नाही. चौथ्या स्तंभावर कधी नव्हता इतका दबाव आताचे केंद्र सरकार आणत आहे, असाही आरोप पटोले यांनी केला. राममंदिर ट्रस्ट, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याद्वारे मंदिर उभारले जात आहे. धर्माच्या नावाखाली या केंद्र सरकारने पैसे जमा केले. मलादेखील अयोध्येत येण्यासाठी आमंत्रण आले आहे. आगामी काळात लवकरच मी अयोध्येला जाणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post भाजपने लॉकडाऊनच्या संधीत सरकारे पाडली : नाना पटोले appeared first on पुढारी.