नाशिक : अल निनोबाबत सतर्क राहा – सीईओ आशिमा मित्तल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल निनो परिस्थितीमुळे यंदाचा पावसाळा हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यावर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजन केल्यास संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीपासून बचाव करता येईल, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व बीडीओंना केल्या आहेत.

जिल्ह्यात अल निनो परिस्थितीबाबत गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अनुषंगाने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व विभागप्रमुख व गट विकास अधिकारी यांची दुरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेत बीडीओंना सूचित केले. सध्याचा टंचाई आराखडा हा तयार करून त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मि‌ळाली आहे. अल निनोमुळे वेळ पडल्यास आपल्याला सुधारित आराखडा तयार करून त्याला मान्यतादेखील मिळणार आहे. त्यामुळे सर्व बीडीओंनी आतापासूनच टंचाईबाबतही काम करत राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. ग्रामीण भागातील टंचाई आराखडे हे लवकरात लवकर तयार करावेत. गेल्या ५ वर्षांत ज्या ज्या ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली, अशा गावांचा समावेशदेखील टंचाई आराखड्यात करावा, ग्रामपंचायतीचे पाण्याचे स्रोत, खासगी पाण्याचे स्रोत या माहितीचे संकलन करून आतापासूनच पाणीकपातीला सुरुवात करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या बैठकीत दिले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनीदेखील अल निनोमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबत मार्गदर्शन केले.

हेही वाचा:

The post नाशिक : अल निनोबाबत सतर्क राहा - सीईओ आशिमा मित्तल appeared first on पुढारी.