नाशिक : अवैध मद्य कारवाईचा आलेख वाढला

मद्यसाठा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या वर्षीच्या तुलनेने चालू आर्थिक वर्षात अवैध मद्यवाहतूक व साठा करणार्‍यांवर कारवाईचा आलेख वाढवला आहे. त्याचप्रमाणे जप्त केलेल्या मुद्देमालासोबत हजारहून संशयितांचीही धरपकड केली आहे. त्यामुळे अवैध मद्यसाठ्यासह त्यांचे वारस वाढल्याने परराज्यातून होणारी अवैध मद्यवाहतूक व विक्रीवर अंकुश लावण्याचे प्रयत्नही वाढले आहेत.

शहरासह जिल्ह्यात अवैध मद्यवाहतूक, विक्री व साठा करणार्‍यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे कारवाई केली जाते. त्यासाठी जिल्ह्याच्या वेशींवर विभागाचे भरारी पथके गस्त मारत असतात, तसेच गुप्त माहितीच्या आधारे संशयितांवर कारवाई करतात. त्यानुसार चालू वर्षात 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबरअखेर विभागाने एक हजार 631 गुन्हे दाखल करून त्यात तीन कोटी 82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी विभागाने 1,151 संशयितांना अटक केली असून, 619 गुन्ह्यांमध्येे बेवारस मुद्देमाल आढळून आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत विभागाने 1,515 गुन्हे दाखल केले होते. त्यात तीन कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त केला होता, तसेच अवघे 599 संशयित पकडले होते. त्याचप्रमाणे 929 कारवायांमध्ये बेवारस मुद्देमाल आढळून आला होता. त्यामुळे या गुन्ह्यांमध्ये आढळून आलेला मुद्देमाल नेमका कोठून आला व कोठे नेला जात होता हे गुलदस्त्यात राहिले होते.

मद्यवाहतुकीसाठी शक्कल
अवैध मद्यवाहतूक करण्यासाठी आरोपी वाहनांमध्ये अनेक फेरफार करतात. काही कारवायांमध्ये वाहनांच्या हेडलाइटजवळ, इंजिनजवळ मद्यसाठा आढळून आला होता. तर मोठ्या वाहनांच्या संरचनेत बदल करून छुपे कप्पे तयार करून त्यात मद्यसाठा लपवला जात असतो. नुकत्याच केलेल्या कारवाई साबणासाठी लागणार्‍या जेलच्या आड मद्यवाहतूक केल्याचे कारवाईतून उघड झाले.

कारवाई करताना संशयित आरोपींना पकडण्यासाठीही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पथकांमार्फत संशयितांना पकडण्यासाठी सापळे रचले जातात. त्यामुळे यावर्षी केलेल्या कारवायांमध्ये आरोपीही पकडले गेले आहेत. गस्त वाढवण्यासोबत चेकपोस्टद्वारे अवैध मद्यवाहतूक व विक्रीवर लक्ष ठेवले जाते. या पुढील काळात कारवाई अधिक गतिमान केली जाणार आहे. – शशिकांत गर्जे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग.

हेही वाचा:

The post नाशिक : अवैध मद्य कारवाईचा आलेख वाढला appeared first on पुढारी.