नाशिक : शंभर वर्षांनंतर मल्हारखाणमधील नागरिकांना मिळणार न्याय

आमदार देवयानी फरांदे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आमदार देवयानी फरांदे यांनी विधिमंडळात लक्षवेधीच्या माध्यमातून मल्हारखाण येथील जागेबाबत चर्चा उपस्थित केली. संबंधित जागा शासन जमा करून त्या ठिकाणी राहणार्‍या नागरिकांना सर्वांसाठी घरे या धोरणानुसार हक्काची घरे देण्याची मागणी केली.

भूमापन क्रमांक 670 ही शासकीय जागा असताना या जागेला वारस लावले गेले. या जागेची विक्री करण्यात आली. विक्रीची नोंद शासकीय दफ्तरात करण्यात आली. यामुळे ही जागा शासन जमा करण्यात येऊन तेथील नागरिकांना घरे दिली जावी. गेल्या 100 वर्षांपासून शासनाची जमीन खासगी व्यक्तीच्या नावे झालेल्या असताना महसूल विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याबद्दल फरांदे यांनी खंत व्यक्त केली. याबाबत कारवाई नको 100 वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्य करणार्‍या नागरिकांना न्याय द्या, अशी आर्त ठोस भूमिका फरांदे यांनी मांडली. याबाबत उत्तर देताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भूमापन क्रमांक 670/अ जागा विजेचे पॉवर हाऊस करता भागवत यांना दिल्याचे दिसून येते. या जागेची विक्री व वारस लागल्याचेही दिसून येते. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत शर्तभंग झाल्याचे दिसून येते. तसेच सर्व्ह नंबर 670/ब ही जागा शंकर पांडू भिल व इतर यांना देण्यात आलेली होती. कोणतीही विक्रीची पूर्व परवानगी न घेता संबंधित जागा विक्री झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबतही शर्तभंग झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या दोन्ही जागा शासन जमा करण्यात येतील, असे ना. विखे-पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : शंभर वर्षांनंतर मल्हारखाणमधील नागरिकांना मिळणार न्याय appeared first on पुढारी.