नाशिक : आग विझविणाऱ्या रोबोटला ‘डेमो’चा अडसर

नाशिक ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबईच्या धर्तीवर आग विझविणारा रोबोट नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागात दाखल होण्यास आणखी काही अवधी लागणार आहे. हा रोबोट कशा पद्धतीने काम करतो, याचा ‘डेमो’ दाखविण्यासाठी संबंधित कंपनीने महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण केले आहे. मात्र, संबंधित कंपनीने नाशिकमध्येच याबाबतचा डेमो दाखवावा, असा आग्रह धरल्याने अद्यापपर्यंत हा रोबोट महापालिकेच्या अग्निशमन विभागात दाखल होऊ शकलेला नाही.

शहरात होणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आग विझविणारा रोबोट खरेदी करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार काही कंपन्यांना पाचारण करून रोबोटद्वारे आग विझविण्याची प्रात्यक्षिके सादर केली जाणार होती. या रोबोटची किंमत साधारणत: दोन कोटी रुपये इतकी आहे. हा रोबोट कितीही मोठी आग असली, तरी 900 अंश तापमानातदेखील आतमध्ये जाऊन पाण्याची फवारणी करू शकतो. अग्निशमन अधिकारी सुरक्षित अंतरावर थांबून रिमोटद्वारे रोबोटला सहज ऑपरेट करू शकतात. मुंबई महापालिकेकडे असा रोबोट आहे. त्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाने ज्युपिटर, साई या दोन कंपन्यांशी रोबोटसाठी बोलणी सुरू केली होती. या दोन्ही कंपन्यांना डेमो देण्यासाठी महापालिकेत पाचारण करण्यात आले होते.

मात्र, कंपन्यांनी महापालिकेलाच मुंबई येथे डेमो दाखविण्याचा आग्रह धरल्याने अद्यापपर्यंत रोबोट महापालिकेच्या अग्निशमन विभागात दाखल होऊ शकला नाही. सद्यस्थितीत या विभागात मोजक्याच मनुष्यबळावर कामकाज सुरू आहे. अशात लवकरात लवकर रोबोट दाखल झाल्यास, शहरातील आगीच्या घटना तत्काळ आटोक्यात आणण्यास मोठा फायदा होऊ शकेल.

हेही वाचा :

The post नाशिक : आग विझविणाऱ्या रोबोटला 'डेमो'चा अडसर appeared first on पुढारी.