नाशिक : आजपासून सुरु होणाऱ्या भैरवनाथ महाराज यात्रोत्सवाची जय्यत तयारी

सिन्नर www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा बुधवारी (दि. 5) साजरी होत असून यात्रा कमिटीकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त मंदिराला रंगरंगोटीसह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

यात्रेच्या दिवशी शहरातून निघणार्‍या रथ मिरवणुकीसाठी असलेला रथही सजवण्याचे काम सुरू आहे. नोकरीसाठी बाहेर गेलेले व माहेरवाशिणी यात्रेनिमित्त हमखास येत असतात. येथील विडी कामगारांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या सागवानी रथाचीही संपूर्ण रंगरंगोटी करण्यात आली आहे. यात्रेच्या दिवशी सजविलेल्या रथातून भैरवनाथ महाराजांच्या मुकुटाची मिरवणूक काढण्यात येते. त्र्यंबक बाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी यात्रा उत्साहात साजरी केली जात असे. मात्र, यंदा त्याची उणीव सिन्नरकरांना भासणार आहे. रथ मिरवणुकीत भजनी मंडळी रथाच्या मागे भजन गात असतात. रस्त्यांवर सडा-रांगोळी काढण्यात येते. यावेळी जागोजागी कावडधारकांची पूजा करुन प्रसाद दिला जातो. घराघरातून महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. रथाच्या मागे शेकडो कावडीधारक पहाटेच्या 4 वाजेपासून तर सायंकाळपर्यंत अनवाणी पायांनी चालत असतात. अनेक कावडधारक कावडीद्वारे सामाजिक संदेश देत असतात. मिरवणुकीनंतर गंगेचे पाणी आणून देवाला अभिषेक घातला जातो. रथ ओढण्यासाठी परिसरातील शेकडो शेतकरी आपल्या बैलजोड्या घेऊन शहरात येत असतात. नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार व सिन्नर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. यात्रोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन संयोजक मधुकर भगत, विलास महाराज भगत, कृष्णाजी भगत, चिंतामण भगत, मनोज भगत यांच्यासह नाशिक वेस मित्र मंडळाने केले आहे.

बाराद्वारीच्या शेतात कुस्त्यांचा फड रंगणार
ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरापासून जवळच असलेल्या बाराद्वारी परिसरातील शेतात गुरुवारी (दि.6) सायंकाळी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. अनेक नामवंत पहिलवान या दंगलमध्ये सहभागी होणार आहेत. विजेत्या पहिलवानांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

रथाच्या मार्गावरील भाजीबाजार बंद
नाशिक वेस, गंगावेस, भैरवनाथ मंदिर, सरस्वती पूल, खासदार पूल येथे भाजीविक्रेते, रस्त्यावर बसणारे फेरीवाले, हातगाडीवाले आदींना नगरपालिका व पोलिस प्रशासन दुकाने न थाटण्याची आवाहन करणार आहे. रथाच्या मार्गावर भरणारा भाजीबाजार बंद ठेवण्यात आलेला आहे.

विंचुरीदळवीत कावड मिरवणुकीचे आयोजन
विंचुरीदळवी : येथील ग्रामदैवन भैरवनाथ महाराज यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून, बुधवारी (दि.5) भैरवनाथ महाराज व गुरुवारी (दि.6) हनुमान यात्रेचे तयारी करण्यात आली आहे. यात्रेच्या दिवशी सकाळी भैरवनाथ महाराज अभिषेक व कावड मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी पालखी मिरवणूक व रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.7) सायंकाळी 4 ला कुस्ती स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील पहिलवानांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : आजपासून सुरु होणाऱ्या भैरवनाथ महाराज यात्रोत्सवाची जय्यत तयारी appeared first on पुढारी.