नाशिक : इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस; पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

इगतपुरी, पुढारी वृत्तसेवा : बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाने इगतपुरी तालुक्यात दमदार हजेरी लावली. गेल्या चार दिवसांपासून इगतपुरी संततधार सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. मृग नक्षत्रात पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली होती. त्यामुळे शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत होते. आद्रा नक्षत्राला सुरुवात होताच वरुणराजाने तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. चोवीस तासात ७३ मिमीची नोंद झाली आहे तर आतापर्यंत ५१६ मिमी पाऊस झाला आहे.

बिपरजॅाय वादळामुळे यंदा पावसाला दाखल होण्यास विलंब झाला होता. काही शेतकऱ्यांनी भात पेरणी केली होती. त्यामुळे पावसाअभावी दुबार बियाने खरेदीचे संकट शेतकऱ्यावर आले होते. त्यामुळे मृग नक्षत्रात पाऊस येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या धूळपेरणीसाठी पावसाचे आगमन गरजेचे झाले होते. परिणामी, शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. परिसरातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अपक्षेप्रमाणे जरी पावसाचे आगमन झाले नसले, तरी शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला आहे. मात्र आता ज्या पेरण्या बाकी आहेत त्यांना वाफ मिळत नाही. इगतपुरी शहरासह तालुक्यात पावसाचा जोर कायम असून आज ७३ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ५१६ मिलीलिमीटर पाऊस पडला आहे. पावसामुळे रस्ते जलमय झाले असून वातावरणात गोठवणारा गारवा पसरला आहे. पावसाच्या सततधारेमुळे बळीराजा सुखावला आहे

शेतकऱ्यांची पावले वळली शेताकडे…

मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या; मात्र त्यानंतर पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे वाढलेल्या उकाड्याने अंगाची लाहीलाही होत होती. अशातच दीर्घ उसंतीनंतर पावसाचे आगमन झाले आहे. अनेकांनी शेताची नांगरणी केली आहे. तसेच ज्यांच्याकडे पाण्याची सोय होती, त्यांनी धान्याचे परे टाकले होते; मात्र पावसावर अवलंबून असलेले शेतकरी त्यापासून वंचित होते. अखेर दमदार पाऊस बरसल्याने शेतकरी कामाला लागला आहे.

हेही वाचलंत का?

The post नाशिक : इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस; पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला appeared first on पुढारी.