नाशिक : एअर कार्गोतून यूके, दुबई, सौदी अरेबियात जाणार बाप्पा

गणपती परदेशात www.pudhari.news

सिडको : पुढारी वृत्तसेवा

वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर गणरायाच्या आगमनासाठी सार्वजनिक मंडळांसह घरोघरी तयारी सुरू आहे. विदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. पर्यावरण संवर्धनाचा वसा घेत साकारलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्तींना विदेशातही मागणी वाढली आहे. सिडको व शहरातून एअर कार्गोने पाठविण्यात आलेल्या 650 गणेशमूर्ती यूके, दुबईसह सौदी अरेबियात पोहोचल्या आहेत. त्या देशांमध्येही विविध भागांत गणेशमूर्ती स्थापनेची तयारी सुरू आहे. विदेशात श्री गणेशमूर्ती वेळेत पोहोचल्याची माहिती मूर्तिकार मयूर मोरे यांनी दिली.

गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते. यंदा मात्र हे सावट दूर झाले असून, शासनानेदेखील सर्व निर्बंध हटविले आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आवडीप्रमाणे आकर्षक गणेशमूर्ती घेण्यासाकडेही भाविकांचा कल वाढला आहे . विशेष म्हणजे काही वर्षांपासून सातत्याने शाडू मातीच्या गणेशमूर्तींना मागणी वाढत आहे. विदेशातही आता घरोघरी गणरायाची स्थापना करण्याची क्रेझ वाढत आहे. याचमुळे शाडू मातीच्या गणेशमूर्तींना यंदा यूकेसह दुबई, सौदी अरेबिया येथून चांगली मागणी वाढत आहे. याचमुळे एअर कॉर्गोमार्फत जुलैमध्ये शाडू मातीच्या 650 गणेशमूर्ती पाठविण्यात आल्या. विशेष म्हणजे दोन वर्षांच्या तुलनेत यंदा विदेशातून गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे. गणेशमूर्तींच्या किमतीत मागील वर्षीपेक्षा 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती मूर्तिकार मयूर मोरे यांनी दिली.

शाडू मातीतील मात्र पारंपरिक स्वरूपातील गणेशमूर्ती विदेशातील भाविकांना अधिक भावतात. त्यामुळे आवडीप्रमाणे मात्र पारंपरिकतेचे दर्शन घडविणार्‍या गणेशमूर्तीचे बुकिंग ते आठ महिन्यांपूर्वीच करतात. विदेशातून गणेशमूर्तींना मोठी मागणी वाढत आहे. त्यांना विदेशात वेळेपूर्वी गणेशमूर्ती मिळाल्या आहेत. सिडको व शहरातसुद्धा आम्ही नफा कमी करून गणेशभक्तांना शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती विक्री केल्या आहेत. – मयूर मोरे, मूर्तिकार, सिडको.

हेही वाचा:

The post नाशिक : एअर कार्गोतून यूके, दुबई, सौदी अरेबियात जाणार बाप्पा appeared first on पुढारी.