नाशिक : ‘एक सीसीटीव्ही शहरासाठी’ ; पोलिसांसाठी उपयुक्त संकल्पना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

‘एक सीसीटीव्ही शहरासाठी’ या संकल्पनेंतर्गत नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी, व्यावसायिक ठिकाणी किंवा आस्थापनांच्या ठिकाणी बसविलेले सीसीटीव्ही पोलिसांसाठी उपयुक्त ठरत आहेत. दहीपूल येथे जानेवारी महिन्यात झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी नागरिकांना सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नागरिकांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे दोन हजार सीसीटीव्ही पोलिसांच्या तसेच जनतेच्या फायद्यासाठी उपलब्ध झाले आहेत.

दहीपूल परिसरात वर्चस्ववादातून दोन गटांत सशस्त्र दंगल झाली होती. यात दंगेखोरांनी दुकानांसह वाहनांची तोडफोड करून एकाच्या खुनाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल असून, संशयितांची धरपकडही करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी व्यावसायिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना सीसीटीव्ही बसविण्याचे पोलिस ठाणेनिहाय आवाहन केले. त्यानुसार नागरिकांनी त्यांच्या आस्थापनांभोवती सीसीटीव्ही उभारले आहेत. त्यामुळे परिसरातील प्रत्येक हालचालींवर नजर राहात असून गुन्ह्यांची उकल करण्यासही याचा फायदा होत आहे.

असा झाला बदल

याआधी खासगी आस्थापनाचालकांनी बसविलेले सीसीटीव्ही त्यांच्या क्षेत्रापुरतेच मर्यादित होते. मात्र गुन्हे घडल्यानंतर या सीसीटीव्हींमध्ये गुन्हेगार किंवा घटना कैद होत नसल्याचे पोलिसांनी आस्थापनाचालकांना लक्षात आणून दिले. त्यामुळे त्यांनी एक सीसीटीव्ही शहरासाठी द्यावा, जेणेकरून स्वत:सह सार्वजनिक सुरक्षितताही राहील हे पटवून सांगण्यात आले. त्यानुसार प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे 150 आस्थापनांनी कॅमेरे बसविल्याने सुमारे १ हजार ९५० सीसीटीव्हींचा वापर शहरासाठी होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : 'एक सीसीटीव्ही शहरासाठी' ; पोलिसांसाठी उपयुक्त संकल्पना appeared first on पुढारी.