नाशिक : ऐन दिवाळीत सिटीलिंक कर्मचारी संपाच्या तयारीत

सिटीलिंक बस,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळी सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना सिटीलिंकच्या वाहक पुरवठादार ठेकेदाराची मुजोरी सुरूच असून, कर्मचाऱ्यांना बोनस तर सोडाच पण वेतनही न मिळाल्याने संपाची शक्यता वाढली आहे. कर्मचाऱ्यांना वेतन तसेच बोनसची रक्कम दहा नोव्हेंबरपर्यंत अदा करण्याचा इशारा सिटीलिंक व्यवस्थापनाने ठेकेदाराला दिला होता. त्यास आता दोन दिवसच शिल्लक राहिले असून, वाहकांना बोनसह वेतनाची प्रतीक्षा आहे. (Citylink Bus Nashik )

सिटीलिंकची बससेवा तोट्यात असली तरी चांगल्या दर्जाच्या प्रवासी सेवेमुळे ही बससेवा नाशिककरांची लाइफलाइन बनू पाहत आहे. सिटीलिंकचे उत्तम व्यवस्थापन तसेच चालक, वाहकांच्या परिश्रमामुळे ही सेवा नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र, या बससेवेच्या वाहक पुरवठादार कंपनीमुळे सिटीलिंकला आजवर तब्बल पाच वेळा संपाला सामोरे जावे लागले आहे. प्रवाशांकडून तिकीट संकलनासाठी कंडक्टर अर्थातच वाहकांची नियुक्ती करण्याचा ठेका वादात आहे. या ठेकेदार व वाहक कर्मचाऱ्यांमध्ये वेतन व अन्य मुद्यावरून सातत्याने संघर्ष होत आहे. गतवेळी संप मिटल्यानंतर ठेकेदाराने एक कोटी चाळीस लाख रुपयांचा विविध कारणांसाठी आकारला जाणारा दंड नियमबाह्य असल्याचा आरोप करत पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे धाव घेतली होती. भुसे यांनी यासंदर्भात आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना निर्देश दिले. मात्र ठेकेदाराचा दंड माफ केल्यास महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याने दंड समायोजनाचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. त्यातच आता वाहकांना दिवाळीच्या बोनसची प्रतीक्षा असताना वेतनही होऊ शकलेले नाही. त्यामुळे सिटीलिंकचे वाहक पुन्हा एकदा संपाच्या पवित्र्यात आहेत. (Citylink Bus Nashik )

नव्या वाहक पुरवठादाराची नियुक्ती रखडली

जुन्या ठेकेदाराच्या मुजोरीमुळे वारंवार होणाऱ्या संपामुळे त्रस्त झालेल्या सिटीलिंक प्रशासनाने वाहक पुरवठ्यासाठी नवीन ठेकेदार नेमण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नागपूर येथील युनिटी मॅनपॉवर या कंपनीची निविदाही मंजूर केली गेली. मात्र, ठेकेदाराकडून बँक गॅरंटी सादर न झाल्यामुळे कार्यारंभ आदेश देणे शक्य झालेले नाही. त्यामुळे सिटीलिंकसमोर पुन्हा एकदा संपाचे संकट उभे राहिले आहे.

वाहक पुरवठादार ठेकेदाराने वाहकांना येत्या दोन दिवसांत वेतन-बोनस देणे अपेक्षित आहे. त्यासंदर्भात सिटीलिंक प्रशासनाने निर्देश दिले आहेत. १० नोव्हेंबरपर्यंत वेतन-बोनस अदा न केल्यास ठेकेदारावर कारवाई केली जाईल.

– मिलिंद बंड, महाव्यवस्थापक, सिटीलिंक

हेही वाचा :

The post नाशिक : ऐन दिवाळीत सिटीलिंक कर्मचारी संपाच्या तयारीत appeared first on पुढारी.