नाशिक : ओझरखेड कालव्यात पडून दोनवर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

file photo

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
वडनेर भैरव (ता. चांदवड) शिवारातील शेतालगत असलेल्या ओझरखेड कालव्यात बुडून दोनवर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना शुक्रवारी (दि.24) घडली आहे.

गाळशी (ता. दिंडोरी) येथील मूळचे रहिवासी असलेले दगू गायकवाड हे कुटुंबीयांसह वडनेर भैरव येथे वास्तव्यास आहेत. गायकवाड कुटुंब गाव शिवारातील शेतात काम करत असताना त्यांचा दोनवर्षीय मुलगा कृष्णा दगू गायकवाड हा खेळताना शेताला लागून असलेल्या कालव्यात पडला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांंनी त्याला तत्काळ बाहेर काढून वडनेर भैरव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून कृष्णा यास मृत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच वडनेर भैरवचे सहा. पोलिस निरीक्षक मयूर भामरे, सहा. पोलिस उपनिरीक्षक आर. एस. आवारे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या प्रकरणी दगू गायकवाड यांच्या माहितीवरून वडनेर भैरव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ओझरखेड कालव्यात पडून दोनवर्षीय चिमुरड्याचा मृत्यू appeared first on पुढारी.