नाशिक : कडनोर, मुरकुटे यांना गुणवंत पोलिस पदक

गुणवंत पदक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली असून, त्यात महाराष्ट्रातील 31 पोलिसांना शौर्य पोलिस पदक जाहीर झाले आहे. तर, चार अधिकार्‍यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून, 39 पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांना गुणवंत पोलिस पदक जाहीर झाले आहेत. त्यामध्ये नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांना गुणवंत पोलिस पदक जाहीर झाले आहे. तर ग्रामीणचे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागात संलग्न असलेले सुखदेव मुरकुटे यांनाही गुणवंत पोलिस पदक जाहीर झाले.

विशेष कामगिरीसाठी 901 पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांना पोलिस पदके जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र पोलिस दलातील 31 पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांना शौर्य पोलिस पदक, चौघांना राष्ट्रपती पोलिस पदक तर, 39 अधिकारी-कर्मचार्‍यांना गुणवंत पोलिस पदक जाहीर झाले आहेत. तसेच नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेतील पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर व सुखदेव मुरकुटे यांना गुणवंत पोलिस पदक जाहीर झाले आहेत. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कडनोर यांचे अभिनंदन केले आहे. 32 वर्षांच्या सेवेत 377 रिवॉर्डस ः उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर हे जून 1991 मध्ये नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात भरती झाले. मूळचे ऊसवाड (ता. चांदवड) येथील रहिवासी असलेले कडनोर यांनी देवळाली कॅम्प, नाशिकरोड, भद्रकाली, विशेष शाखेसह गुन्हेशाखांमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांनी केलेल्या तपासामुळे गंभीर गुन्ह्यातील 12 आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. 32 वर्षांच्या पोलिस सेवेत त्यांनी विविध जबाबदार्‍या यशस्वीरीत्या पार पाडल्या. 2015 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात कडनोर यांनी बंदोबस्ताचे नियोजन, विशेष अतिथींच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडली होती. कडनोर यांना 2017 मध्ये पोलिस महासंचालक पदकानेही गौरविण्यात आलेले आहे. कडनोर यांनी सेवा कालावधीत 377 रिवॉर्डस मिळविले तर, त्यांना 35 प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे.
दहशतवाद्यांविरोधात मुरकुटेंची अचूक कारवाई: मूळचे सिन्नर येथील रहिवासी असलेले सुकदेव खंडू मुरकुटे हे 18 जून 1990 रोजी नाशिक ग्रामीण पोलिस दलात भरती झाले. त्यांची पहिली नेमणूक मनमाड पोलिस ठाण्यात झाली. त्यानंतर येवला शहर पोलिस, स्थानिक गुन्हेशाखा, दहशतवादविरोधी पथक, आर्थिक गुन्हे शाखेत सेवा बजाविल्यानंतर सध्या ते नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर सेवा बजावत आहेत. 33 वर्षांच्या पोलिस सेवेत मुरकुटे यांनी 221 पारितोषिके मिळविली आहेत. तर 2013 मध्ये त्यांना पोलिस महासंचालक पदक व सन्मानचिन्हाने गौरविण्यात आलेले आहे. सेवा काळात त्यांनी विविध गुन्ह्यांची उकल केली असून, दहशतवादविरोधी पथकात काम करताना औरंगाबाद शस्त्रसाठा व पुण्याच्या जंगली महाराज रोडवरील बॉम्बस्फोटातील आरोपींना अटक करण्याच्या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कडनोर, मुरकुटे यांना गुणवंत पोलिस पदक appeared first on पुढारी.