नाशिक : कळवणमध्ये शेतमजूरावर बिबट्याचा हल्ला

बिबट्याचा हल्ला

कळवण, पुढारी वृत्तसेवा : कळवण शहरालगत असलेल्या संदीप पगार यांच्या शेतातील टमाटा खुडणीसाठी आलेल्या शेतमजूरावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतमजूनर गंभीर जखमी झाला आहे. भीमसन रामदार पवार (रा. शेरी भैताने, वय ३५) असे जखमी झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. त्याच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वनपरीक्षेत्र अधिकारी दिपाली गायकवाड यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, कळवण खुर्द भागात सकाळी ६ वाजेच्या सुमारास फिरण्यासाठी गेलेल्या काही महिलांनी बिबट्याला मुक्तपणे संचार करताना पाहिले होते. तेथून जवळच असलेल्या हरी ओम लॉन्सशेजारील टमाट्याच्या मळ्यात काही काळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने काम करणाऱ्या शेतमजूरावर पाठीमागून हल्ला केल्याने  गंभीर दुखापत झाली आहे. शेतमजूराचा ओरडण्याचा आवाज एकूण इतर मजुरांनी काठ्यांच्या सहाय्याने बिबटयाला पिटाळून लावत शेत मूजराचा जीव वाचवला.

तसेच त्यास तातडीने कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वनविभागाला झालेल्या घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी दिपाली गायकवाड यांनी तात्काळ पीडिताची विचारपूस करून मजुरी करणाऱ्या त्याच्या कुटुंबीयास माणुसकीच्या नात्याने तात्काळ मदत देऊ केली आहे. तसेच ज्या शेतात बिबट्याने हल्ला केला त्याची पाहणी वनविभागाने केली असता, बिबट्या त्याच ठिकाणी दाट झूडपात बसलेला आढळून आला आहे. विभागाने तात्काळ पिंजरा लावत परिसरात आजूबाजूला सतर्क राहण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे.

हेही वाचलंत का?

The post नाशिक : कळवणमध्ये शेतमजूरावर बिबट्याचा हल्ला appeared first on पुढारी.