नाशिक : कायदा मोडल्यास गणेश मंडळाच्या अध्यक्षावर कारवाई

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सव साजरा करताना कोणत्याही मंडळाकडून कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे यांनी दिला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिस ठाण्यात पंचवटी, म्हसरूळ आणि आडगाव या तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गणेश मंडळांच्या संयुक्त बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, म्हसरूळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक साखरे, आडगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख, पोलिस निरीक्षक युवराज पत्की, सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, मनपाचे पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया यांच्यासह अग्निशमन व विद्युत विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांना शासन व पोलिस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांचे अनुपालन करणे बंधनकारक असल्याबाबतची माहिती देण्यात आली. सर्व गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी उपस्थित केलेल्या सूचनांचेही यावेळी निराकरण करण्यात आले. बैठकीस उपस्थित मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पोलिस विभागास पूर्णपणे सहकार्य करणार असल्याबाबत ग्वाही दिली. या बैठकीस गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंडळांनी ही काळजी घेण्याची सूचना:
वाहतुकीस अडथळा होणार नाही, मनपा व पोलिस परवानगीशिवाय व्यासपीठ उभारू नये, ध्वनिक्षेपकाची डेसिबलची क्षमता ओलांडली जाऊ नये, मद्यपान करू नये, वीजपुरवठा अधिकृत घ्यावा, घातपात टाळण्यासाठी स्वयंसेवकांनी नजर ठेवावी, सीसीटीव्हीचा वापर करावा, स्वयंसेवकांचा जास्तीत जास्त वापर करावा, वर्गणी जमा करताना बळजबरी करू नये, गुलालाचा वापर न करता फुलांचा वापर करावा, निर्माल्य कलशाचा वापर करावा, आक्षेपार्ह देखावे सादर करू नये. तसेच ड्रोन कॅमेरा वापरण्याकरिता पोलिस आयुक्त यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे आदी सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा:

The post नाशिक : कायदा मोडल्यास गणेश मंडळाच्या अध्यक्षावर कारवाई appeared first on पुढारी.