नाशिक : कुसुमताईंसारख्या देणगीदारांच्या त्यागातून ‘मविप्र’चा विकास : अ‍ॅड. नितीन ठाकरे

मविप्र www.pudhari.news

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
एकशे आठ वर्षांची परंपरा असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाचा वटवृक्ष कै. कुसुमताई निराकांत पवार यांच्यासारख्या देणगीदारांच्या उदार दातृत्वामुळेच उभा आहे, असे प्रतिपादन संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले.

सिन्नर महाविद्यालयात आयोजित थोर देणगीदार कै. कुसुमताई पवार यांच्या शोकसभेप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संचालक कृष्णाजी भगत, कुसुमताई पवार यांचे चिरंजीव सुमंत पवार, कुसुमताईंच्या सुना, मुलगी, याबरोबरच अण्णासाहेब गडाख, डॉ. आर. डी. पवार, सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार, इंदूमती कोकाटे, स्मिता उगले, अ‍ॅड. अनिता पवार आदी उपस्थित होते. देणगीदारांनी जमीन, पैसा आणि विविध स्वरूपामध्ये उदार अंत:करणाने देणग्या दिल्यामुळेच मवित्र समाज संस्था खेड्यापाड्यात तळागाळापर्यंत पोहोचली. त्यागामुळेच त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आद्य कर्तव्य ठरते आणि म्हणूनच कुसुमताई पवार यांनी केलेला त्याग संस्था कधीच विसरणार नाही, असे ठाकरे म्हणाले. ज्येष्ठ सभासद अण्णासाहेब गडाख यांनीही पवार कुटुंबाविषयी असलेला ऋणानुबंध आणि कुसुमताई यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्याचा आढावा घेत श्रद्धांजली अर्पण केली. प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य केरू पाटील पवार, सरपंच डॉ. पवार, डॉ. आर. डी. पवार, प्रा. अनिल देशमुख यांचीही कै. पवार यांच्यावर श्रद्धांजलीपर भाषणे झाली. डॉ. डी. बी. वेलजाळी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल चव्हाणके, आकाश दळवी, म्हस्के यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. एम. जाधव, प्रा. आर. व्ही. पवार, प्रा. ए. ए. पोटे, प्रा. एस. एस. पवार आदींसह प्राध्यापक व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोरगरिबांसाठी कुसुमताईंचा त्याग : कृष्णाजी भगत
कृष्णाजी भगत म्हणाले की, गोरगरिबांनी शिक्षण घ्यावे म्हणून कुसुमताई पवार यांनी मोठा त्याग केला आहे. त्यांच्या या त्यागामुळेच सिन्नर तालुक्याच्या दुष्काळी भागातील विद्यार्थी शिक्षण घेऊन सातासमुद्रापार पोहोचले आहेत. साडेचौदा एकर जमीन आणि पंचवीस हजार रुपये रोख रक्कम हे त्या काळामध्ये देणे महान दातृत्वामुळेच शक्य झाले. त्यांच्या या महान कार्याचा आपल्याला कधीच विसर पडणार नाही असे सांगून त्यांनी स्व. पवार यांच्या कार्याचा गौरव केला.

हेही वाचा:

The post नाशिक : कुसुमताईंसारख्या देणगीदारांच्या त्यागातून ‘मविप्र’चा विकास : अ‍ॅड. नितीन ठाकरे appeared first on पुढारी.