नाशिक : कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी मराठी भाषा अभ्यास केंद्र

वाचनालय www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ज्येष्ठ साहित्यिक कवी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून यासाठी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तरण तलावाशेजारील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी हे मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारण्यात येणार आहे. कुसुमाग्रजांच्या हयातीत या परिसरात वाचनालय उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी मनपाच्या वतीने कुसुमाग्रजांच्या घराचे जतन करण्यात आले आहे. घराजवळील भागात बांधकाम करून अद्ययावत मराठी भाषा अभ्यास केंद्र तयार करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. कवी कुसुमाग्रजांचे साहित्य आणि लेखन हे अभ्यास करणार्‍यांना मार्गदर्शक असे आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हे कुसुमाग्रजांचे स्वप्न होते. जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. नाशिक मालेगाव विभागातील नगरपालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी आमदार तांबे यांनी शासनाकडून एकूण दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामध्ये मराठी भाषा अभ्यास केंद्रासाठी 50 लाख, नाशिक महानगरपालिकेची शाळा मॉडेल स्कूल तयार करण्याकरिता 50 लाखांचा निधी आणि मालेगावमधील पाच उर्दू शाळांच्या विकासासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मराठी ही राजभाषा, ज्ञानभाषा व्हावी यासाठी केलेल्या संघर्षामध्ये कुसुमाग्रज नेहमीच अग्रेसर होते. त्यांनी केलेल्या संघर्षाला दर्जेदार कलाकृतींना अभिवादन करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी कुसुमाग्रजांच्या स्मारकस्थळी मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारले जाणार आहे. -सत्यजित तांबे, आमदार.

हेही वाचा:

The post नाशिक : कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी मराठी भाषा अभ्यास केंद्र appeared first on पुढारी.