जागतिक आदिवासी दिन विशेष : आदिवासी खेळाडूंची फॅक्टरी “क्रीडा प्रबोधिनी’

आदिवासी दिन विशेष,www.pudhari.news

नितीन रणशूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कलागुण, बौद्धिक क्षमता असते. या मुलांच्या क्रीडा गुणांना चालना देऊन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून नाशिकमध्ये सन २०१५ मध्ये आदिवासी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना केली होती. आता हीच प्रबोधिनी आदिवासी खेळाडूंची फॅक्टरी बनली आहे. प्रबोधिनीचे खेळाडू आपल्या उत्कृष्ट कामगिरीने राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व गाजवत आहेत.

अनुसूचित जमातीच्या विदयार्थ्यांमध्ये जन्मत: असलेल्या विविध क्षमता काही ठरावीक खेळांसाठी उपयोगी ठरू शकतात. त्यामुळे या विदयार्थ्यांना क्रीडाविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यास ते विविध खेळांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य संपादन करण्याची शक्यता लक्षात घेऊन आदिवासी क्रीडा प्रबोधिनीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. गेल्या आठ वर्षांमध्ये कबड्डी, खो-खो आणि ॲथलेटिक्सच्या ७८ खेळाडूंना प्रबोधिनीत धडे देण्यात आले आहे. त्यामध्ये मुलांची संख्या ४४ तर मुलींची संख्या ३४ आहे.

आदिवासी क्रीडा प्रबोधिनी परिसरात निवासी वसतिगृहाची सुविधा असून, खेळाडू विद्यार्थ्यांना डीबीटीसह शाळेत जाण्या-येण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध असते. वैयक्तिक तसेच सांघिक खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगणांमध्ये अद्ययावत क्रीडा साहित्याद्वारे उत्तम दर्जाच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू सराव करतात. आहारतज्ज्ञांच्या सूचनेनुसार प्रत्येक खेळाडूंच्या दर्जेदार व पोषक आहारावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात येते. प्रबोधिनीत फीजिओथेरपिस्ट, मसाजर, क्रीडा सल्लागार हेदेखील खेळाडूंसाठी उपलब्ध असतात.

दरम्यान, आदिवासी युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा व काटकता असते. धावणे, पोहणे, लांब, उंच उडी आणि नेमबाजीसह विविध क्रीडा प्रकारांचे कौशल्य नैसर्गिकरीत्या असते. त्यामुळे ॲथलेटिक्स, खो-खो आणि कबड्डीपाठोपाठ आदिवासी क्रीडा प्रबोधिनीत यंदापासून नव्याने सात क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात कनो-कायाकिंग, नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती, धनुर्विद्या, बॉक्सिंग, स्वीमिंग आदी समावेश आहे. तर प्रबोधिनीच्या क्षमतेही वाढ करण्यात आल्याने आता १०० खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या खेळाडूंनी गाजविले मैदान

कबड्डी : सुनंदा पवार, ज्योती पवार, सीमा पेठे, शालू घोटेकर, गणेश टेकाम,

खो-खो : चंदू चावरे (राष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई)

ॲथलेटिक्स : माणिक वाघ, प्रवीण चौधरी, कार्तिक हरिपाल

आदिवासी क्रीडा प्रबोधिनीत अद्ययावत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील आदिवासी खेळाडूंसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्याचा फायदा खेळाडूंना आगामी काळात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळविण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये होणार आहे.

– जीतिन रहमान, प्रकल्प अधिकारी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक

हेही वाचा : 

The post जागतिक आदिवासी दिन विशेष : आदिवासी खेळाडूंची फॅक्टरी "क्रीडा प्रबोधिनी' appeared first on पुढारी.