नाशिक क्राईम : शहरात दिवसाला ६० टवाळखोरांवर कारवाई

टवाळखोरांवर कारवाई,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांसह टवाळखाेरांवरही कारवाई केली जाते. त्यानुसार शहर पोलिसांनी जानेवारी ते जुलैदरम्यान पोलिसांनी १२ हजार ७७४ टवाळखोरांवर कारवाई केली आहे. त्यामुळे चालू वर्षात दिवसाला सरासरी ६० टवाळखोरांवर कारवाई झाली आहे. गत वर्षात हे प्रमाण दिवसाला ३० इतके होते.

शहर पोलिसांतर्फे दररोज वेगवेगळ्या मोहिमा राबवून गुन्हेगारांसह टवाळखोरांवर कारवाई केली जाते. त्यात नियमfत गस्तीद्वारे सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर, धूम्रपान करणाऱ्यांवर, छेडछाड करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. तसेच आवश्यकतेनुसार काही जणांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे या कारवाईचा दणका गुन्हेगारीकडे आकर्षित होऊ पाहणाऱ्या तरुणाईस बसत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. कारवाईच्या भीतीपोटी अनेक जण हुल्लडबाजी, टवाळखोरी करत नसल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. तरीही पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. त्यानुसार चालू वर्षात जुलै अखेरपर्यंत पोलिसांनी दररोज सरासरी ६०, तर महिन्याला सरासरी १ हजार ८२५ टवाळखोरांवर कारवाई केली जात आहे.

गत वर्षीच्या तुलनेत या कारवाईत दुपटीने वाढ झाली आहे. गत वर्षात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत १० हजार ८४१ जणांवर कारवाई झाली आहे. टवाळखोरांवरील कारवाईमुळे पोलिसांकडे टवाळखोरांचा रेकॉर्ड तयार होत असून, त्यातून भविष्यात कोणताही गुन्हा घडल्यास त्यात टवाळखोरांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करताना पोलिसांना फायदेशीर ठरेल, असे बोलले जात आहे.

टवाळखाेरांवरील कारवाई

वर्ष : कारवाई

२०२२ : १०,८४१

जुलै २०२३ पर्यंत : १२,७७४

प्रतिबंधात्मक कारवाईतही वाढ

शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर मोक्का, एम. पी. डी. ए.अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करत आहेत. त्यानुसार २०२२ मध्ये एका टोळीवर मोक्का, तर दोघांना एम. पी. डी. ए.अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. या वर्षात त्यात वाढ झाली असून, ४ टोळ्यांवर मोक्का व ९ जणांना एम. पी. डी. ए.अंतर्गत स्थानबद्ध केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक क्राईम : शहरात दिवसाला ६० टवाळखोरांवर कारवाई appeared first on पुढारी.