नाशिक : खोट्या कर्ज प्रकरणातून ठेवीदारांना १२ कोटींचा गंडा

समर्थ नागरी सहकारी पतसंस्था कळवण,www.pudhari.news

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

खोटी कर्ज प्रकरणे तयार करून ठेवीदारांना १२ कोटी ८५ लाख १४ हजार ५३५ रुपयांचा गंडा घालणाऱ्या कळवण शहरातील श्री स्वामी समर्थ सहकारी पतसंस्थेचा तत्कालीन चेअरमन अशोक तुकाराम जाधव याच्यासह कळवण व सुरगाणा शाखा व्यवस्थापकांविरोधात कळवण पोलिस ठाण्यात ठेवीदारांची फसवणूक व अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

श्री स्वामी समर्थ सहकारी पतसंस्थेच्या कळवण व सुरगाणा शाखांत बोगस व खोटी कर्ज प्रकरणे करून काही कर्ज प्रकरणांच्या व्याजात सूट देत अपहार करण्यात आल्याचे लेखा परीक्षणांत निदर्शनास आले आहे. तसेच पतसंस्थेतील बनावट कर्ज प्रकरणे तयार करून चुकीच्या नोंदी घेऊन बनावट आर्थिक पत्रके तयार करीत ठेवीदारांची १२ कोटी ८५ लाख १४ हजार ५३५ रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था वर्ग २ अधिकारी सूर्यकांत तुकाराम गांगुर्डे यांनी श्री स्वामी समर्थ सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन अशोक तुकाराम जाधव, कळवण शाखा व्यवस्थापक नरेश दत्तात्रेय अहिरे व सुरगाणा शाखा व्यवस्थापक भास्कर दत्तात्रेय बत्तासे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक समाधान नागरे अधिक तपास करीत आहेत.

लेखा परीक्षणातील नोंदविलेली निरीक्षणे

दि. १ एप्रिल २०१९ ते २ डिसेंबर २०१९ या कालावधीत बोगस व खोटी प्रकरणे तयार करून १ कोटी ३ लाख ७२ हजार दर्शविण्यात आलेली कर्जवाटप रक्कम, ११ एप्रिल २०१९ रोजी राजेंद्र भास्कर बत्तासे यांच्या नावाने ११ लाख ६३ हजार रुपये गहाण कर्ज प्रकरण, ३१ मार्च २०१९ अखेर प्रत्यक्षात न मिळालेले व्याज उत्पन्नात ११ कोटी ५७ लाख ७ हजार ७७५ रुपये घेऊन बनावट आर्थिक पत्रके तयार करणे, सुरगाणा शाखेत १२ लाख ७१ हजार ७६० रुपये व्याजात सूट देऊन केलेला अपहार अशा एकूण १२ कोटी ८५ लाख १४ हजार ५३५ रुपयांचा अपहार.

ठेवीदार धास्तावले 

हातविक्री करून उपजीविका भागविणारे, मजूर, शेतकऱ्यांसह अनेक नागरिक या पतसंस्थेत ठेवी ठेवतात. त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन संस्थाचालकाने खोटी प्रकरणे तयार करून ठेवीदारांची फसवणूक केल्याने सर्वसामान्य ठेवीदार धास्तावले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : खोट्या कर्ज प्रकरणातून ठेवीदारांना १२ कोटींचा गंडा appeared first on पुढारी.