नाशिक : गावागावांत जिल्हा परिषदेची ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम

स्वच्छता ही सेवा मोहिम,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमात गावांची दृश्यमान स्वच्छता ही थीम घेऊन हे अभियान गावागावांत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.

जिल्ह्यात शाश्वत स्वच्छता राहावी व आरोग्यसंपन्न गावे निर्माण व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार गावांमध्ये दृश्यमान स्वच्छतेसाठी एक राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत गावांमध्ये दृश्यमान स्वच्छतेसाठी गावातील कचराकुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई करणे, कचरा स्त्रोतांच्या ठिकाणी (सुका व ओला) वेगळे करण्यासाठी जनजागृती करणे, कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्र निर्माण करणे, प्लास्टिकसारखा अविघटनशील कचरा एकत्रित करून नियोजन करणे, पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ ठेवणे, एकल प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याबाबत जनजागृती करणे, घोषवाक्य लेखन, विविध स्पर्धेचे आयोजन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.

‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम राबविण्याबाबत तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असून जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य व महिला व बालविकास विभागांनाही याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसहभागातून सदरचे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे. स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यांची कामे पूर्ण करण्याबाबत या अभियानात विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दिली.

हेही वाचा :

The post नाशिक : गावागावांत जिल्हा परिषदेची ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम appeared first on पुढारी.