नाशिक : ‘गाव विकणे आहे’ शेतक-यांच्या घोषणेनंतरही शासनाची दखल नाही

देवळा; पुढारी वृत्तसेवा : केंद्र आणि राज्य शासन शेतकरी विरोधी असल्याने आम्हाला आमच्या शेतजमिनी शासनाला विक्री करायच्या आहेत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असून याला संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात माळवाडी (ता देवळा) येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या वतीने शासनाला निवेदन दिले.

यावेळी अविनाश बागुल, विनायक शिंदे, जयदीप भदाणे,ज्ञानेश्वर बागुल, रमेश अहिरे, यशवंत पवार, भगवान जाधव, विलास नाना रौदळ, ग्रामपंचायत सरपंच शिवाजी बागुल, फुले माळवाडी सरपंच उषा शेवाळे, शिव व्याख्येता यशवंत गोसावी, आदी पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, तात्पुरती मलमपट्टी म्हणजेच अनुदान न देता उत्पादन खर्चावर आधारित शाश्वत भाव मिळवून द्यावा, तुकडे बंदी कायदा जो शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे, तो त्वरित रद्द करून शेतकऱ्यांची सुटका करावी, आणि महत्वाचे म्हणजे खाणाऱ्यापेक्षा, पिकवणाऱ्यांच्या विचाराला शासनाने प्रथम प्राधान्य द्यावे.

तसेच कांद्याचा प्रश्न राज्य आणि केंद्र शासनाने कायमस्वरूपी निकाली काढावा. येथील शेतकऱ्यांचे कांदा हे नगदी पीक आहे. मात्र कांदयाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी शासनाला जाग यावी, म्हणून शेतक-यांनी ‘हे’ टोकाचे पाऊल उचलले आहे.

हेही वाचलंत का ? 

 

The post नाशिक : 'गाव विकणे आहे' शेतक-यांच्या घोषणेनंतरही शासनाची दखल नाही appeared first on पुढारी.