नाशिक : गुढीपाडव्यानिमित्ताने नाशिककरांनी लुटला खरेदीचा आनंद

gudhi www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, मराठी नूतन वर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठा सजल्या. यावेळी शहरवासीयांची खरेदीसाठी झुंबड उडाली. दरम्यान, गुढीपाडव्याच्यानिमित्ताने शहर परिसरात बुधवारी (दि.२२) शोेभायात्रा निघणार असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तब्बल दोन वर्षांनंतर यंदा मनाप्रमाणे गुढीपाडवा साजरा करता येणार असल्याने नाशिककरांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या सणाच्या निमित्ताने मंगळवारी (दि.२१) बाजारपेठांमध्ये खरेदीची रेलचेल पाहायला मिळाली. गुढीसाठी काठी, रेशमी वस्त्र, हार-कडे, रंगीबेरंगी फुले यासह पूजा साहित्य खरेदीचा नागरिकांनी आनंद लुटला. तसेच दरवर्षीप्रमाणे इकोफ्रेंडली गुढी खरेदी करण्याकडेही सामान्यांचा कल होता. यंदाच्या वर्षी महागाईमुळे वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. तरीही नागरिकांनी खिशाकडे न बघता पाडव्यासाठी मनमुराद खरेदी केली.

गुढीपाडव्यानिमित्ताने शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्ष स्वागत समितीतर्फे शहरातील सहाही विभागांमधून शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. पंचवटीतून दोन शोभायात्रा निघणार असून, पहिली यात्रेस काळाराम मंदिरापासून प्रारंभ होणार आहे. दुसरी यात्रा रामवाडीमधील कौशल्यनगर येथून निघणार आहे. याव्यतिरिक्त ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांची खास मेजवानी असणार आहे. एकूणच यंदाच्या वर्षी गुढीपाडवा दणक्यात साजरा करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : गुढीपाडव्यानिमित्ताने नाशिककरांनी लुटला खरेदीचा आनंद appeared first on पुढारी.