नाशिक : गुरुकुल आश्रम अत्याचार प्रकरण : पीडितांसह चिमुकल्यांची रवानगी बालगृहात

बालगृह,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंचवटीतील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील सहा विद्यार्थिनींवर संस्थाचालक हर्षल बाळकृष्ण मोरे (३२, रा. मानेनगर) याने आश्रमासह सटाणा तालुक्यातही अत्याचार केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणाची बालकल्याण समितीने गंभीर दखल घेतली आहे. समितीने चौकशी सुरू केली असून, पीडितेसह एकूण तेरा बालिकांची रवानगी बालगृहात करण्यात आली आहे. संशयित मोरेने २०१८ पासून पीडितांचे शोषण केल्याचे तपासात समोर आले आहे.

ज्ञानदीप आश्रमात चौदा वर्षांच्या विद्यार्थिनीला अश्लील चित्रफीत दाखवून मोरेने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप एका पीडितेने केल्यानंतर या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मोरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर इतर पीडितांनीही मोरे याने त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केल्याने म्हसरूळ पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी एका पीडितेवर सटाणा तालुक्यात अत्याचार केल्याचे समोर येत आहे. मोरे विरोधात बलात्कार, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) आणि ॲट्रॉसिटीसह इतर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा तपास सहायक आयुक्त दीपाली खन्ना करीत आहेत. मोरे हा आदिवासीबहुल भागात जाऊन मोलमजुरी करणाऱ्या गरीब पालकांना मुलींसाठी मोफत शिक्षण, निवास व भोजनव्यवस्था असल्याचे सांगून नाशिकमधील आश्रमात आणत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तवली फाटा येथे एका वसतिगृहात संशयित हर्षल मोरे व्यवस्थापक म्हणून नोकरीस होता. मात्र, काही वर्षांपूर्वी या वसतिगृहाच्या संचालकावर शोषणाचे आरोप झाल्याने हे वसतिगृह बंद झाले. त्यानंतर मोरे याने तेथील नोकरीदरम्यान केलेल्या ओळखीच्या जोरावर व दानशूर व्यक्तींशी संपर्क साधून स्वत:चा आश्रम सुरू केल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे मोरे हा द्रोण तयार करण्याचे कामही करायचा.

हेही वाचा :

The post नाशिक : गुरुकुल आश्रम अत्याचार प्रकरण : पीडितांसह चिमुकल्यांची रवानगी बालगृहात appeared first on पुढारी.