Nashik Crime : पंचवटीतील मारहाणीतील जखमी तरुणाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल

crime

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंचवटीतील सीतागुंफा चौकात दोघांनी केलेल्या मारहाणीत परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. मोहम्मद साहेब बाबू मोहम्मद मन्सूर (२९, रा. कॉलेजरोड, नाशिक, मूळ रा. बिहार) असे मारहाणीत मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहेब बाबूचा मित्र मोहम्मद इंजमामुल मोहम्मद गुलजार हक (२३, रा. कॉलेजरोड, मूळ रा. बिहार) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, खुनाचा गुन्हा दाखल असून पोलिसांनी संशयित केशव शिंदे याला ताब्यात घेतले आहे. बिहार राज्यातील परतैली येथील रहिवासी साहेब बाबू हा नाशिकमधील कॉलेजरोड परिसरात व्यवसायानिमित्त राहात होता. मंगळवारी (दि. ६) दुपारी 1.30 च्या सुमारास त्याला संशयित केशव व त्याच्या साथीदाराने भेटण्यास बोलावले होते. त्यानुसार साहेब बाबू हा मित्र इंजमामुलसोबत सीतागुंफा चौकात गेला होता. त्यावेळी बोलताना साहेब बाबू व इंजमामुलसोबत दोघांचा वाद झाल्याने केशव व त्याच्या मित्राने लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात साहेब बाबू गंभीर जखमी झाला. जखमी साहेब बाबूला आडगाव वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र बुधवारी (दि. ७) सायंकाळी बाबूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले.

खुनाचे कारण गुलदस्त्यात

साहेब बाबू याचा वैयक्तिक कारणातून संशयितांसोबत वाद असल्याचे समजते. संशयितांनी समजावूनही साहेब बाबू ऐकत नव्हता. त्यामुळे संशयितांनी त्यास बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे येत आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : पंचवटीतील मारहाणीतील जखमी तरुणाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.