नाशिक : गोंदे-पिंप्रीसदो सहापदरीकरण होणार

हेमंत गोडसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोंदे ते पिंप्रीसदो या दरम्यानच्या महामार्गाचे सहापदरीकरण तसेच मुंबई-आग्रा रोडवरील आडगाव शिवारातील दहावा मैल, जऊळके फाटा तसेच नाशिक तालुक्यातील आंबेबहुला येथे पूल मंजूर केलेले आहेत. येत्या 18 डिसेंबरला ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते चारही कामांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

संबंधित चारही कामे 860 कोटींची आहेत. या कामांमुळे नाशिक-मुंबई दरम्यानच्या वाहतुकीची कोंडी टळणार असून, खानदेशातील प्रवाशांना समृद्धी महामार्गाला सहजपणे येता येणार आहे. बोगद्यांमुळे अपघात टळण्यास मोठी मदत होणार आहे. गोंदे फाटा ते पिंप्रीसदोदरम्यानच्या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी असते. पिंप्रीसदोपासून समृद्धी महामार्ग हा अगदीच हाकेच्या अंतरावर आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक टाळण्यासाठी आणि धुळे, जळगाव, नंदुरबारच्या प्रवाशांना पिंप्रीसदो शिवारातील समृद्धी महामार्गावर लवकरात लवकर पोहोचण्यासाठी गोंदे ते पिंप्रीसदो या दरम्यानच्या रस्त्याचे सहापदरीकरण गरजेचे असल्याचे खा. गोडसे यांनी ना. गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

कामांसाठी निधी असा…
मागील महिन्यात ना. गडकरी यांनी गोंदे ते पिंप्रीसदोदरम्यानच्या रस्त्याचे सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, या कामासाठी 700 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. गोंदे ते पिंप्रीसदोदरम्यानच्या रस्त्याच्या सहापदरीकरणासाठी 700 कोटी, तर दहावा मैल चौकातील उड्डाणपुलासाठी सुमारे 45 कोटी, जऊळके फाटा येथील बोगद्यासाठी 55, तर आंबेबहुलासाठी 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : गोंदे-पिंप्रीसदो सहापदरीकरण होणार appeared first on पुढारी.