नाशिक : ग्रामीण विद्यार्थ्यांचा जीईई, एनईईटी तयारीचा खर्च जि. प. करणार

JEE admission

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक लक्ष उत्पन्नाच्या मर्यादेतील गुणवत्ताधारक निवडक ११० विद्यार्थ्यांना सन २०२३-२०२४ व २०२४-२०२५ या दोन वर्षांसाठी जेईई व एनईईटीसाठी मोफत प्रवेश मिळण्यासाठी पात्रता प्रवेशपरीक्षा दि. २ जुलै रोजी होणार असून, त्यासाठी २७ जूनपर्यंत दिंडोरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सादर करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी केले आहे.

शासनाकडून नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन वर्षांसाठी नाशिक सुपर ५० हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांना माहे मार्च २०२३ मध्ये दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांची जेईई व एनईईटीसाठी निवड करण्यात येणार आहे. यासाठी दि. २ जुलै रोजी परीक्षा होणार असून, उच्चतम गुणांनुसार मुलांची यादी तयार करण्यात येणार आहे. यात जेईईसाठी ५५, तर एनईईटीसाठी ५५ इतक्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी असून, पुढील भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी या संधीचा फायदा होणार आहे. पात्र विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च जिल्हा परिषदमार्फत करण्यात येणार असल्याने या संधीचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेणे अपेक्षित आहे. शिक्षण विभागाकडे संपर्क साधल्यानंतर अर्जाचा नमुना दिला जाणार आहे. त्याचा कालावधी दि. २७ जूनपर्यंत असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भास्कर कनोज यांनी केले आहे.

१) विद्यार्थी विभाजन :-

आदिवासी उपयोजना टीएसपीअंतर्गत अनुसूचित जमाती – ४० विद्यार्थी (२०- जेईई व २० – एनइइटी), अनुसूचित जाती १० विद्यार्थी (५ -जेईई व ५- एनईईटी), सर्वसाधारण प्रवर्ग- ६० विद्यार्थी (३०-जेईई व ३०- एनईईटी), उपरोक्त नमूद विद्यार्थिसंख्येत जेईई अभ्यासक्रमासाठी २ दिव्यांग विद्यार्थी व एनईईटी अभ्यासक्रमासाठी २ दिव्यांग विद्यार्थी.

२) पात्रता :-

मार्च २०२३ इयत्ता दहावीमध्ये ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण

११ लाखांपर्यंत उत्पन्नाची मर्यादा 

अधिवास प्रमाणपत्र

अनुसूचित जाती व जमातीसाठी जातीचा दाखला * दिव्यांगांसाठी ४० टक्के दिव्यांगत्व असलेले प्रमाणपत्र.

The post नाशिक : ग्रामीण विद्यार्थ्यांचा जीईई, एनईईटी तयारीचा खर्च जि. प. करणार appeared first on पुढारी.