नाशिक : ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायत निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देवळा : ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या दहिवड, फुलेनगर, वासोळ, वाजगाव, मटाणे, भऊर, खामखेडा, विठेवाडी, डोंगरगाव, श्रीरामपूर, चिंचवे, कनकापूर, सटवाईवाडी या ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार दि. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, 5 डिसेंबरला छाननी, माघार व चिन्ह वाटप 7 डिसेंबरला, 18 तारखेला मतदान होऊन मतमोजणी 20 डिसेंबरला केली जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली. या गावांमध्ये यापूर्वीच निवडणुकीचे वारे वाहत असून, इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. वॉर्डनिहाय मतदारांच्या गाठीभेटी सुरू झाल्या असून, येत्या दिवसांत राजकीय धुराळा उडणार आहे.

थेट सरपंच आरक्षण पुढीलप्रमाणे…
दहिवड -अनुसूचित जमाती महिला, फुलेनगर – अनुसूचित जाती, वासोळ – नामाप्र, वाजगाव – अनुसूचित जमाती महिला, मटाणे – अनुसूचित जमाती, भऊर – अनुसूचित जमाती महिला, खामखेडा – अनुसूचित जमाती, विठेवाडी – अनुसूचित जमाती, डोंगरगाव – सर्वसाधारण महिला, श्रीरामपूर – अनुसूचित जमाती महिला, चिंचवे – सर्वसाधारण महिला, कनकापूर – अनुसूचित जमाती, सटवाईवाडी – सर्वसाधारण.

सिन्नर : तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर 2022 मध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी या ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकार्‍यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

कार्यकाळ संपलेल्या या ग्रामपंचायतींवर प्रशासक याप्रमाणे नियुक्त करण्यात आले आहेत….

ठाणगाव, नांदूरशिंगोटे, सायाळे या ग्रामपंचायती प्रल्हाद बिब्बे, वडगाव पिंगळा येते सतीश पगार, कातरवाडी, कीर्तांगळी एकलहरे, लोणारवाडी या ग्रामपंचायतीस डॉ. नीलेश भुजाळ, पाटपिंप्रीला सतीश पगार, उजनी, शहा येथे प्रवीण गायकवाड, आशापूर टेंभूरवाडी, डुबेरेवाडी कृष्णनगर ग्रामपंचायत दीपाली मोकळ या विस्तार अधिकार्‍यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर appeared first on पुढारी.