नाशिक : घरांचे पत्रे उडाले, वीज पडून चारा खाक

मालेगाव www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यात वादळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, गहू आदी पिकांना फटका तर बसलाच शिवाय अनेकांच्या घरांचे, कांदा चाळीचे पत्रे उडून गेले. वीज पडून आग लागल्याचीही घटना घडली.

मालेगाव : पोल्ट्रीचालकांचेही मोठे नुकसान झाले असून गारेगावमध्ये वादळी पावसात मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्या.

शनिवारी अवघ्या अर्धा तासात पावसाने दाणादाण उडविली. येसगाव, गोरेगाव, गिलाणे, विराणे, पोहाणे, चिंचवे, वनपट, टिंगरी, कौळाणे, दहिदी आदी भागांना अवकाळी पावसाने झोडपले. मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने ठिकठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. येसगाव खुर्द येथील मनोज रमेश भदाणे यांच्या राहत्या घराचे पत्रे उडून गेले. सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी त्यांचा संसार उघड्यावर पडला. गिलाणेतही गट नंबर 25 येथील रखमाबाई बापू अहिरे यांच्या घराचे पत्रे वादळी वार्‍याने उडाले. वळवाडेत वादळाने थैमान घातले. याठिकाणी तब्बल 16 जणांच्या घरांचे पत्रे उडून त्यांचा संसार भिजला. एकाच्या घराला तडे गेले. त्यात काहींची झोपडी कोलमडून पडली. चोंडी येथे वीज पडून उत्तम राजनोर यांच्या शेतातील चार्‍याला आग लागली. गारेगाव येथील कोमल सदाशिव पाटील यांचे पोल्ट्री शेड उडाल्याने आतील 453 पक्षी मरण पावले. महसूल विभागाकडून पंचनामे केले जात आहेत.

मालेगाव तालुका पर्जन्यमान
मालेगाव                9 मि.मी.
दाभाडी                8 मि.मी.
अजंग                   7 मि.मी.
वडनेर                  3 मि.मी.
कौळाणे निं.           7 मि.मी.
जळगाव निं.           4 मि.मी.
सायने                   5 मि.मी.
निमगाव               5 मि.मी.
एकूण                  48.00 मी.मी.
सरासरी                03.69
एकूण सरासरी       03.69

हेही वाचा:

The post नाशिक : घरांचे पत्रे उडाले, वीज पडून चारा खाक appeared first on पुढारी.