नाशिक : घोटी-खैरगाव मार्गावर रेशनचा सहा लाखांचा तांदूळ पकडला 

रेशनचा तांदूळ जप्त

घोटी : पुढारी वृत्तसेवा

रेशनचा काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा सहा लाख ३६ हजार रुपयांचा तांदूळ घोटी पोलिसांनी सापळा रचून जप्त केला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अन्य दोघे फरार आहेत.

घोटी-खैरगाव मार्गावर आयशर (एमएच १७ एजी ५६६६) वाहनातून रेशनचा काळ्या बाजारात विक्रीसाठी तांदूळ येणार असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक शाहजी उमाप यांना मिळाली होती. त्यांनी घोटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांना याबाबत सतर्क करताच त्यांनी पोलिस पथकासह पहाटेपासून पाळत ठेवली होती. साडेबाराच्या दरम्यान आयशर वाहन रेशनचा तांदूळ घोटी-खैरगाव मार्गावर खाली करण्यासाठी आला असता पोलिस पथकाने चालक आणि किन्नर यांना ताब्यात घेतले. पोलिसांची छापेमारी झाल्याची कळताच बाकी उपस्थित असलेल्यांनी पळ काढला.

प्लास्टिक गोण्यांतून रेशनचा तांदूळ असल्याची खात्री करत पोलिसांनी वाहन मालासह घोटी पोलिस ठाण्यात आणले. याबाबत तहसीलदार कार्यालयात कळवले असता पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार भागवत ढोणे यांनी तांदळाची तपासणी केली. पोलिसांनी संशयित भाऊसाहेब नेरकर, श्रावण सोनवणे (रा. कोकमठाण, संगमनेर) आणि अर्जुन मरसाळे (रा. कोरपगाव) यांना अटक केली. अन्य दोघे फरार झाले आहेत. सहा लाख ३६ हजार रुपयांचा २७० तांदळाच्या गोण्या तसेच बारा लाखांचा आयशर ट्रक पोलिस पथकाने पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : घोटी-खैरगाव मार्गावर रेशनचा सहा लाखांचा तांदूळ पकडला  appeared first on पुढारी.