नाशिक : चोर सोडून संन्याशाला फाशी; वडांगळी अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरण

गौणखनिज www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर
तालुक्यातील वडांगळी ग्रामपंचायत मालकीच्या गटात अवैधरीत्या साठविलेल्या 363 ब्रास वाळूचा साठा आढळून आल्यानंतर तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी थेट ग्रामपंचायतीला जबाबदार धरून सुमारे 1 कोटी 16 लाखांच्या दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. याबाबत ‘दै. पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तथापि, तहसीलदारांच्या कारवाईचा इशारा म्हणजे ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ असल्याची प्रतिक्रिया परिसरात उमटत आहे.

वडांगळी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गट नं. 26/1/1/अ मध्ये 363 ब्रास वाळूचा अवैधरीत्या केलेला साठा आढळल्यानंतर याबाबत स्थळनिरीक्षक पंचनामा करण्यात आला. त्यानुसार वाळूसाठ्याचे बाजारमूल्य काढून त्यावर दंडाची रक्कम ठरविण्यात आली आहे. अवैधरीत्या गौणखनिजाचे उत्खनन आणि साठा केल्याप्रकरणी वाळूमाफीयांवर कारवाई करायची सोडून त्यांना अभय देत महसूल विभागाच्या नोटिसीने ग्रामपंचायत गोत्यात आली आहे. विशेष म्हणजे तहसीलदारांनी ही कारवाई केल्यानंतर देवपूर व वडांगळी येथील मंडळ अधिकार्‍यांनी पंचनामा केला. त्यावेळी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना याबाबत विचारणा करण्यात आली. त्यांनी वाळूसाठा कोणाचा किंवा काय, याबाबत काहीही माहीत नसल्याचे सांगितल्यानंतर ग्रामपंचायतीच्या जागेत साठा आढळल्याने ग्रामपंचायतीलाच जबाबदार धरून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. वडांगळी ग्रामपंचायतीला नुकताच राज्य शासनाचा आर. आर. आबा निर्मल ग्राम पुरस्कार देण्यात आला. अशा ग्रामपंचायतीला अवैध गौणखनिज उत्खननापोटी जबाबदार धरून नोटीस बजावणे म्हणजे ग्रामपंचायतीची अबू्रनुकसान असल्याची चर्चा परिसरात होत आहे. 2020 मध्ये महसूल विभागाच्या पथकाने याच भागात अवैध वाळू उपसा व साठा केल्याप्रकरणी 11 जणांवर कारवाई केली होती. यावरून वाळूमाफीया या भागात सक्रिय आहेत हे स्पष्ट आहे. तथापि, वाळू तस्करी कोणाच्या आशीर्वादाने होते आणि त्यात कोणाचे कसे हात ओले होतात याबाबतही वेगळे सांगण्याची गरज नाही. असे असताना या प्रकरणात थेट ग्रामपंचायतीला जबाबदार धरण्यात आल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या अवैध वाळू उपसा प्रकरणी महसूल विभागाला वेळोवेळी पत्र दिलेले आहे. त्यानंतर संबंधितांनी काय कारवाई केली हा प्रश्न अनुत्तरित आहे. मुळात याबाबत कारवाई करण्याची जबाबदारी तलाठ्याची असताना तलाठी नेमके काय करीत होता आणि महसूल विभागाने तलाठ्याला जबाबदार का धरले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रकरणाशी ग्रामपंचायतीचा काहीही संबंध नाही. तहसीलदारांनी बजावलेली नोटीस चुकीची असून, आम्ही लेखी पत्राद्वारे खुलासा करणार आहोत. ग्रामपंचायत प्रशासनावर नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी आहे. वाळूमाफीयांवर नजर ठेवणे व कारवाई हे काम ग्रामपंचायतीचे नाही. ग्रामपंचायतीने वाळू उपसा अथवा साठा करण्यासाठी कुणालाही परवानगी दिली नाही. – मीनल विक्रम खुळे, सरपंच वडांगळी.

महसूल कर्मचार्‍याच्या नित्यक्रमाची चर्चा
ग्रामपंचायतीवर कारवाईची टांगती तलवार असतानाच वाळूमाफीयांशी साटेलोटे असणार्‍या महसूल विभागातील कर्मचार्‍यांच्या सुरस कथाही यानिमित्ताने चर्चेला येत आहेत. वाळू तस्करांना अभय दिल्याच्या बदल्यात या भागातील महसूलचा एक कर्मचारी चिरीमिरीसह पेट्रोलपंपांवर जाऊन माफीयांच्या नावाखाली स्वत:च्या वाहनात पेट्रोल टाकून घेण्याचा नित्यक्रमही चर्चेत आहे. यासह अनेक सुरस कथा ऐकायला मिळत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : चोर सोडून संन्याशाला फाशी; वडांगळी अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरण appeared first on पुढारी.