नाशिक : जिल्हा परिषदेला बीडीएसवर ५३ कोटींचा निधी

जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या विविध लेखाशीर्षाखाली ५३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीकडून देण्यात आलेली ५३ कोटी रुपयांची बीडीएस न निघाल्याने परत गेली होती. मात्र, यंदा जि.प.ने रात्री उशिरापर्यंत जागे राहात हा निधी ताब्यात घेतला आहे. प्रतीक्षा असलेल्या पुनर्नियोजनाच्या निधीची जुळवाजुळव करण्याचे काम आता जि.प.मध्ये सुरू आहे.

जि.प.मध्ये लेखा व वित्त विभागात शुक्रवारी (दि. ३१) बिले जमा करण्यासाठी ठेकेदारांनी मोठी गर्दी केली होती. प्राप्त झालेली बिले ही कोषागारात जमा करण्यासाठी विभागाची धावपळ सुरू होती. लेखा विभागाने सायंकाळपर्यंत १४१ कोटींची बिले ट्रेझरीमध्ये जमा केली. दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीकडून मिळणारा निधी वर्ग करून घेतला जात होता. गेल्या वर्षी ३१ मार्च २०२२ रोजी रात्री ११.३० ला विकासकामांसाठी ५३ कोटींहून अधिक निधी बीडीएसवर टाकला होता. परंतु जि.प.कडून हा निधी बीडीएसवरून वेळेत काढला नसल्याने तो पुन्हा शासनदरबारी जमा झाला. त्या वेळी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जि.प.वर नाराजी व्यक्त करत कानउघाडणी केली होती. त्यामुळे यंदा निधी पुन्हा जाता कामा नये, अशी सक्त ताकीद मिळाली असल्याने जि.प. प्रशासन, बीडीएसकडे डोळे लावून बसले होते.

असा आहे निधी….
जिल्हा नियोजन समितीकडून १७.२७ कोटी,
आमदार निधीतील कामांसाठी, डोंगरी विकासअंतर्गत ७.४५ कोटी
राज्य शासनाच्या विविध विभागांकडून २८.५० कोटींचा निधी

रात्री 2.30 पर्यंत होती जि.प. : ३१ मार्चच्या रात्री 2.30 पर्यंत जिल्हा परिषदेतील वित्त विभागात बीडीएसवरील निधीचे काम सुरू होते. गेल्या वर्षी निधी प्राप्त न झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली असल्याचा अनुभव पाठीशी असल्याने यंदा वित्त विभागाने काळजी घेत निधी पदरात पाडून घेतला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्हा परिषदेला बीडीएसवर ५३ कोटींचा निधी appeared first on पुढारी.