नाशिक : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेवर सहकार पॅनलची एकहाती सत्ता

सहकार पॅनल विजयी,www.pudhari.news

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत समता आणि सहकार पॅनलमध्ये झालेल्या सरळसरळ लढतीत सत्ताधारी समता पॅनलचा सहकारी पॅनलने धुव्वा उडवत एकहाती सत्ता काबिज केली.

गेल्या २७ वर्षांपासून सत्तेत असलेल्या समता पॅनलला रवींद्र आंधळे, विक्रम पिंगळे, प्रमोद निरगुडे यांच्यासह प्रत्येक शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी उमेदवारी करत सुरुंग लावला. यामध्ये २१-० अशा फरकाने सहकार पॅनलने निर्भेळ यश प्राप्त केले आहे. जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांमध्ये दिवसभर या निकालाची उत्सुकता होती. जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंकेच्या २१ जागांसाठी रविवारी (दि.२) मतदान झाले होते. यामध्ये बॅंकेच्या ८ हजार ५८ मतदारांपैकी ५ हजार ७४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. निवडणुकीत ज्येष्ठ नेते भाऊसाहेब खताळे, रमेश राख यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी समता पॅनल, तर ज्येष्ठ नेते उत्तमबाबा गांगुर्डे, महेश आव्हाड, रवींद्र थेटे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल यांच्यात लढत झाली. सोमवारी (दि. ३) सकाळी ८ पासून औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी लाॅन्स येथील सभागृहात निवडणूक अधिकारी गौतम बलसाने, सहायक निवडणूक अधिकारी पंडित पवार, मनीषा खैरनार यांच्या उपस्थितीत मतमोजणीला प्रारंभ झाला.

मतमोजणीसाठी १० टेबलांवर २०० कर्मचारी कार्यरत होते. सकाळच्या पहिल्या टप्यात १० मतपेट्यांमधील मतपत्रिकांची जुळणी करून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार आघाडीवर होते. साधारण ४०० ते ६०० दरम्यान आघाडीचा पहिल्याअखेर कल होता. दुपारी दुसऱ्या टप्प्यातील मतपेटीतील मतपत्रिकांची मतमोजणी झाली. पहिल्या टप्प्याचा असलेला कल अखेरपर्यंत कायम राहिला. निवडणूक अधिकारी बलसाने यांनी विजयी उमेदवारांची घोषणा करत, प्रमाणपत्राचे यावेळी वाटप केले.

विजयी उमेदवार

मते अशी

सहकार पॅनल (मते)

सर्वसाधारण गट

अजित आव्हाड (३२९९), सुनील गिते (३०८६), विनोद जवागे (२८३३), बाळासाहेब ठाकरे पाटील (२९५२), विजय देवरे पाटील (३१५०), नीलेश देशमुख (३०१५), प्रमोद निरगुडे (३१३४), रवींद्र बाविस्कर (२९३७), ज्ञानेश्वर माळोदे (३१०७), महेश मुळे (३००२), भरत राठोड (२९८७), जयंत शिंदे (२९१७).

तालुका प्रतिनिधी

अभिजित घोडेराव (३१५२), अमोल बागूल (३२४४), रमेश बोडके (३२१०), सचिन विंचूरकर (३१४६)

इतर मागास

विक्रम पिंगळे (३२१०)

अनु. जाती-जमाती

मोहन गांगुर्डे (३११९)

विमुक्त जाती भटक्या जमाती

रवींद्र आंधळे (३४२८)

महिला राखीव

धनश्री कापडणीस (३२३२)

मंदाकिनी पवार (२७४३)

समता पॅनल (मते)

सर्वसाधारण

अमित आडके (२२१८), दीपक अहिरे (२०५०), प्रशांत कवडे (२०१६), विजय खातळे (२२११), सुरेश चौधरी (१९११), राजेश निकुंभ (१९४२), सुधीर पगार (२२३५), अमित पाटील (२१४१), सतीश भोरकडे (१९१७), गणेश वाघ (२१३२), शशिकांत वाघ (१८१७), प्रीतीश सरोदे (१८३२),

तालुका प्रतिनिधी

प्रशांत गोवर्धने (२२३०), संदीप दराडे (२२८५), हेमंत देवरे (२१६१), मिर्झा गफुर बेग इसाबेग (१९६८)

इतर मागास प्रवर्ग

विजयकुमार हळदे (२३८४)

अनु. जाती-जमाती

प्रदीप अहिरे (२४५२)

विमुक्त जाती-जमाती

प्रवीण भाबड (२१३७)

महिला राखीव

मंगला ठाकरे (२१४९), सरिता पानसरे (२३०८)

आंधळे ठरले किंगमेकर

विद्यमान संचालकांमधील नाराजी ओळखून त्यांचा एक गट आणि नवे उमेदवार तयार करत सहकार पॅनल बनविण्यात रवींद्र आंधळे यांचा मोठा हात होता. उमेदवारी करतानाच विरोधकांनी बनविलेले मनसुबे उधळणेदेखील महत्त्वाचे काम त्यांनी केले. निवृत्त सभासदांचा मतदानाचा अधिकार, निवडणूक अचानक पुढे गेल्याच्या निर्णयाविरोधात प्रशासनासोबत चर्चा करत निवडणूक वेळेत घेण्यात त्यांचा मोलाचा वाटा ठरला. सोबतच निवडणुकीच्या आधीपासूनच आंधळे यांनी सत्ताधारी समता पॅनलच्या अँटीइन्कम्बन्सीचा पुरेपूर फायदा उठवला.

वादाची किनार

मतमोजणीदरम्यान मतमोजणी केंद्रामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानादेखील ओळखपत्र चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या व्यक्तीला तसेच नातेवाइकांना देत मतदान केंद्रामध्ये प्रवेश मिळवला जात होता. पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ कारवाई करत अशा डुप्लिकेट कार्डधारकांना बाहेरचा रस्ता दाखवला जात होता. अशातच एका उमेदवारासोबत पोलिसांची बाचाबाची झाली. इतर उमेदवार आणि वरिष्ठ पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद मिटला.

…आणि थेट जेसीबीमधून गुलाल

बँकेचे सभासद म्हणजेच सरकारी कर्मचारी होय. यांमधूनच ही निवडणूक लढवली गेली. निवडणुकीचा निकाल दृष्टिक्षेपात येताच विजयी उमेदवारांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी गुलाल, बँड आणत आनंदोत्सव साजरा केला. मात्र, यात असेही काही अतिउत्साही कार्यकर्ते होते की ज्यांनी गुलाल उडवण्यासाठी थेट जेसीबीच आणला होता. यापूर्वी आमदारकी, खासदारकी या निवडणुकींच्या जल्लोषात जेसीबी वापरला गेला मात्र या निवडणुकीतही जेसीबी आणला गेल्याने चर्चांना उधाण आले होते.

एका बाजूला जल्लोष, दुसऱ्या बाजूला सन्नाटा

पहिली फेरी जाहीर झाल्यानंतर बऱ्यापैकी निकालाचे चित्र स्पष्ट झाले होते. दुसऱ्या फेरीतील पेट्यांचे मतदान जसजसे पुढे सरकू लागले तसतसे सहकार पॅनलने जल्लोष करायला सुरुवात केली, मात्र बाजूलाच बसलेल्या समता पॅनलच्या उमेदवारांमध्ये सन्नाटा दिसून येत आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेवर सहकार पॅनलची एकहाती सत्ता appeared first on पुढारी.