नाशिकच्या ज्ञानदीप आश्रमातील अत्याचार प्रकरण अधिवेशनात मांडणार: नीलम गोऱ्हे

नीलम गोऱ्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील शासकीय तसेच अशासकीय निवासी आश्रमशाळेत असणाऱ्या मुलींसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, या योजनांची अंमलबजावणी करताना काही अडचणी येत असतील तर त्याबाबतचा अहवाल आठ दिवसांत मागवण्यात आला आहे. याबाबत नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून आवश्यक वाटल्यास संबंधित अधिकाऱ्यांना नागपूर अधिवेशनात बोलवण्यात येईल, असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

म्हसरूळ परिसरातील ज्ञानदीप आधाराश्रमामधील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण करण्यात आले. यासंदर्भात सात मुलींनी शोषणाची तक्रार दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी गोऱ्हे यांनी बुधवारी पोलिस अधिकारी, महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी गोऱ्हे यांनी सांगितले की, ज्ञानदीप प्रकरणात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यात यावी, अशी सूचना केली आहे. या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र मुलींच्या पुनर्वसनसाठी काम होणे गरजेचे आहे.

इगतपुरी येथील जातपंचायतीने बहिष्कृत केलेल्या विवाहितेविषयी पोलिस अधीक्षकांना सूचना करण्यात आल्या आहेत. अधिवेशन काळात सीमावर्ती भाग प्रश्न, शेतीमाल, अपुरे राहिलेले प्रकल्प याविषयी दोन्ही सदनांमध्ये अधिवेशनकाळात आवाज उठवण्यात येईल, असे गोऱ्हे यांनी नमूद केले. सरकार, खासगी संस्थांसाठी आश्रमशाळेविषयी नियमावली होणे गरजेचे आहे. या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला सरकारी वकील हवे का अशी विचारणा करण्यात येणार आहे. बालगृह विधीसंघर्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी काम होणे गरजेचे आहे. महिला व बालविकास विभागाच्या सक्षमीकरणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

लव्ह जिहाद कायद्याविषयी गृहमंत्री फडणवीस यांचा अभ्यास सुरू आहे. त्यांचा अभ्यास झाल्यावर त्यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल. समिती स्थापन केली ही चांगली प्रथा-परंपरा आहेत. यावर भाष्य करण्यासाठी राज्य महिला आयोग आहे. वेगवेगळ्या प्रश्नांवर काम होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले.

हेही वाचा :

The post नाशिकच्या ज्ञानदीप आश्रमातील अत्याचार प्रकरण अधिवेशनात मांडणार: नीलम गोऱ्हे appeared first on पुढारी.