नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या तीन वर्षांपासून सतत लांबणीवर पडत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यामध्ये नाशिकच्या १४ बाजार समित्यांचा सहभाग आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या मतदारयाद्यांचा कार्यक्रम बुधवारी (दि.८) घोषित केला. त्यानुसार १० तारखेपासून मतदारयाद्यांचा कार्यक्रम सुरू होणार असून, २० मार्च रोजी अंतिम मतदारयादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर, लागलीच निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने गेल्या तीन वर्षांपासून बाजार समित्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या. गेल्या वर्षी निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होऊन २९ जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार होते. मात्र, नव्याने निवडणुका झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा मतदारयादीत समावेश न केल्याने सातारा, कोल्हापूरसह नाशिक जिल्हयातील सदस्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे निवडणुका पुढे ढकलण्यात येऊ नये, या मागणीसाठी नागपूर खंडपीठात याचिका दाखल झालेली होती. यावर झालेल्या सुनावणीत ३० एप्रिलपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश खंडपीठाने राज्य शासनाला दिले. तसेच राज्य शासनाच्या वतीने तसे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. त्यामुळे 30 एप्रिलपूर्वी निवडणुका होणार, हे निश्चित झाले होते. त्यानुसार निवडणुका कधी होणार याची इच्छुकांना प्रतीक्षा होती. अखेर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदारयाद्यांचा कार्यक्रम घोषित केल्याने ही प्रतीक्षा संपली आहे.

खलिस्तानवाद्यांचा धोका वाढतोय…!

या समित्यांच्या निवडणुका

नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, येवला, नांदगाव, मनमाड, मालेगाव, चांदवड, देवळा, घोटी, सिन्नर, दिंडोरी, कळवण, सुरगाणा या बाजार समित्यांची मुदत संपलेली होती.

मतदारयाद्यांचा कार्यक्रम

1) जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) यांनी १ सप्टेंबर २०२२ नंतर निवडून आलेल्या सदस्यांची नावे अंतिम मतदारयादीत समाविष्ट करून मतदारयादीत सुधारणा करणे – दि. १० ते २४ फेब्रुवारी.

2) सुधारित प्रारूप मतदारयादी घोषित करणे – दि. २७ फेब्रुवारी.

3) प्रारूप मतदारयादीवर हरकती, आक्षेप मागविणे – २७ फेब्रुवारी ते ८ मार्च.

4) प्राप्त हरकती, आक्षेप यावर निर्णय घेणे – दि. ८ ते १७ मार्च.

5) जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी अंतिम मतदारयादी प्रसिध्द करणे – दि.२० मार्च.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला appeared first on पुढारी.