नाशिक : जिल्ह्यात होणार १०० आदर्श शाळा, सद्यस्थितीतील शाळांच्या दर्जाचे काय?

नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात आदर्श शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे नियोजन सुरू आहे. शिक्षण विभागाने त्यासाठी प्रारूप आराखडादेखील तयार केला आहे. यामु‌‌ळे प्राधान्याने या आदर्श शाळा कशा उभ्या राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रम स्वागतार्ह आहे. मात्र, जिल्ह्यातील सध्याच्या शाळांसाठी पुरेसे शिक्षक आहेत का? विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण देताना त्यांच्या सध्याच्या शाळांना सुविधा आहेत का? शिक्षण विभागामध्ये असलेले अधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांची सद्यपरिस्थिती काय आहे हेदेखील बघणे आवश्यक आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१२) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सुपर ५० आणि १०० मॉडेल शाळा यांची माहिती दिली.

दरम्यान, राज्यघटनेच्या मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे या तिन्ही महत्त्वाच्या भागांमध्ये शिक्षण या विषयाचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे ही पालकांसोबतच राज्य शासनाची जबाबदारीदेखील विशद करण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियान राबविण्यात येत आहे. सर्वच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहे. जिल्हा परिषदेमार्फत १०० आदर्श शाळा तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये २२ प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहे. संरक्षक भिंत, परसबाग निर्मिती, टॅबलेट, डिजिटल बोर्ड, व्हर्च्युअल रिअॅलिटी सिस्टिम, क्रीडांगण विकास, खेळ साहित्य, ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, इंटरनेट सुविधा, स्मार्ट टीव्ही, योगा तसेच आरोग्यनिर्मिती यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात शिक्षणाधिकारीच प्रभारी

सध्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक ३,२६६ शाळांमध्ये दोन लाखांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. त्यांना शिकविण्यासाठी जवळपास १० हजार शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षण विभागामध्ये जिल्ह्यात शिक्षणाधिकारी हे पदच प्रभारी आहे. तर १५ तालुक्यांत अवघे तीन गटशिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी एक प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात अवघे दोनच गटशिक्षणाधिकारी कार्यरत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यात होणार १०० आदर्श शाळा, सद्यस्थितीतील शाळांच्या दर्जाचे काय? appeared first on पुढारी.