नाशिक जिल्ह्यात ५४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसीच नाही

शेतकरी सन्मान योजना, e kyc www.pudhari,news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वारंवार आवाहन करूनही जिल्ह्यातील ५४ हजार १२४ शेतकऱ्यांनी त्यांचे आधार बॅंक खात्याशी (ई-केवायसी) (PM Kisan eKYC) संलग्न केलेले नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून ते वंचित राहत आहेत. तसेच संबंधित लाभार्थींना राज्यस्तरावरील मु‌ख्यमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ कसा द्यायचा, या विवंचनेत प्रशासन सापडले आहे.

केंद्र शासनामार्फत २०१९ पासून देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ६ हजार रुपये मानधन वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ४ लाख ४४ हजार २४० शेतकरी योजनेत सहभागी झाले आहेत. प्रत्यक्षात ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या ३ लाख ९० हजार ११४ शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे. ऊर्वरित ५४ हजार १२४ लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्यापही त्यांचे ई-केवायसी पूर्ण केलेले नाही. ई-केवायसी न केलेल्या लाभार्थींमध्ये सिन्नर तालुका अव्वल असून, तेथील 7,418 शेतकरी आहेत. त्याखालोखाल मालेगावमध्ये ६ हजार ८०७ शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी (PM Kisan eKYC) केलेली नाही. या यादीत सर्वात तळाला पेठ असून, तेथे १,२२५ शेतकरी आहेत. वारंवार आवाहन करूनही हे शेतकरी केवायसीसाठी पूढे येत नसल्यामुळे शासनाने त्यांना वितरीत केले जाणारे मानधन थांबवून ठेवले आहे.

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना लागू केली आहे. केंद्राच्या योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना शासन वार्षिक सहा हजार रूपये तीन टप्प्यांत देणार आहे. मानधनाची ही रक्कम दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर वर्ग केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या याद्या तातडीने अद्ययावत करून घेण्याचे निर्देश शासनाने जिल्हास्तरावरील यंत्रणांना दिले आहेत. मात्र, आवाहन करूनही शेतकरी केवायसीची प्रक्रिया पूर्ण करत नसल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.  (PM Kisan eKYC)

गावोगावी कॅम्प

शेतकरी सन्मान याेजनेत ई-केवायसी नसल्याने शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल व कृषी विभाग गावोगावी कॅम्पचे आयोजन करीत आहे. तसेच तलाठी व ग्रामसेवकांमार्फत शेतकऱ्यांशी संपर्क साधत त्यांना केवायसी करून घेण्याच्या सूचना करत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून हे कॅम्प आयोजित केले जात असल्याने ई-केवायसी नसलेल्या शेतकऱ्यांची संख्या ६६ हजारांवरून कमी होऊन ५४ हजारांपर्यंत खाली आली आहे. येत्या महिनाअखेरपर्यंत ही संख्या शून्यावर आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

ई-केवायसी नसलेले लाभार्थी

बागलाण : २१७१, चांदवड : ४५८८, देवळा : 2694, दिंडोरी : 3382, इगतपुरी : 2072, कळवण : २०११, मालेगाव : 6807, नांदगाव : 4381, नाशिक : 3120, निफाड : 5847, पेठ : 1225, सिन्नर : 7418, सुरगाणा : 2413, त्र्यंबकेश्वर : 2146, येवला : 3851, एकूण : ५४१२४

हेही वाचा : 

The post नाशिक जिल्ह्यात ५४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसीच नाही appeared first on पुढारी.