नाशिक : झाडांना खिळ्यांच्या वेदना, मनपा कारवाई करेना

झाडांना खिळे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अनेक वेळा गुन्हे दाखल करूनदेखील शहरात राजरोसपणे सिमेंट काँक्रीटच्या भिंतीप्रमाणे झाडांना खिळे ठोकून त्यावर जाहिरातीचे फलक लटकविले जात आहेत. लाजीरवाणी बाब म्हणजे कॉलेज रोडसारख्या उच्चभ्रू वसाहतीत अशा प्रकारे जाहिरातीबाजी करून वृक्षसंपदेला इजा पोहोचविली जात आहे. तर मनपा प्रशासनाकडून याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याने ठोकलेल्या खिळ्यांमध्ये झाडांचा श्वास गुदमरत आहे.

शहराच्या सर्वच भागात झाडांना खिळे ठोकून त्यावर फलकबाजी केली जात आहे. वृक्षसंपदेवर खिळे ठोकून त्यावर जाहिरातबाजी करणे बेकायदेशीर असून, असे कृत्य केल्यास थेट गुन्हे दाखल करणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र, मनपा प्रशासनाची ही भूमिका केव्हाच हवेत विरल्याने, व्यापारी-विक्रेत्यांकडून सर्रासपणे झाडांना इजा पोहोचविण्याचे काम केले जात आहे. विशेषत: अंबड-लिंक रोड परिसरातील प्रत्येक झाडाला खिळे ठोकून त्यावर बॅनर लटकविल्याचे नजरेस पडते. शहराच्या इतर भागांतही हीच स्थिती असून, झाडांवर खिळे ठोकणार्‍यांवर कारवाईच होत नसल्याने असल्या प्रकाराला अक्षरश: ऊत आला आहे. 2019 मध्ये महापालिकेने सिमेंट काँक्रीटच्या भिंतीप्रमाणे झाडांना खिळे ठोकून जाहिरातबाजी करणार्‍या महाभागांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर अनेक दिवस अशा प्रकाराला आळा बसला होता. आता शाळा, कॉलेज नियमित सुरू झाले आहेत. आस्थापने पूर्ववत सुरू आहेत. बाजारात उत्साह आहे. याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी झाडांचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे माहिती देणारे फलक शहरभर झाडांना खिळे ठोकून लावले जात आहेत. हॉटेलचालकांचेही यात मोठे प्रमाण आहे. दिशादर्शकांसाठीदेखील झाडांचा वापर केला जात आहे. दरम्यान, या विरोधात ठोस कारवाईसह झाडांना नवी संजीवनी देण्यासाठी मनपा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून केली जात आहे.

झाडांवर खिळे ठोकून त्यांना इजा पोहोचविणे खूपच दुर्दैवी असून, मनपा आयुक्तांनीच याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. एकीकडे वृक्षारोपण मोहिमा राबविल्या जातात अन् दुसरीकडे डेरेदार वृक्षांना अशा प्रकारे इजा पोहोचविण्याचे प्रकार केले जात असल्याने, वृक्षप्रेमींनी पुन्हा एकदा एकत्र येऊन याविरोधात आंदोलन उभे करण्याची गरज निर्माण झाली आहे. – दर्शन पाटील, वृक्षप्रेमी.

खिळ्यांमध्ये झाडे मृतावस्थेकडे …
झाडांमध्ये झायलम आणि प्लोएम हे घटक असतात. या घटकामुळे झाडांना फांद्यांपर्यंत खाद्य आणि पाणी प्रवाहित होत असते. मानवी शरीरात असलेल्या रक्तवाहिन्यांसारख्या त्या काम करतात. मात्र, झाडांवर खिळा ठोकला, तर हा प्रवाह खंडित होतो. गंजलेल्या खिळ्यांमुळे झाडांना इजा होते. हळूहळू झाडांना मृतावस्थेकडे नेणार्‍या या खिळ्यांना काढणे गरजेचे आहे. पण, ते काढण्याऐवजी झाडांना शहरात खिळे ठोकण्याचे प्रकार वाढतच आहेत.

रात्रीस खेळ चाले…
शहरात यापूर्वी दिवसा झाडांना खिळे ठोकून फलक लावण्याच्या प्रकारांना कायद्याने रोखले. फलक लावणार्‍यांवर थेट पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. आता मात्र अंधाराचा फायदा घेत रात्री असे फलक झाडांवरती लावले जात आहेत. शहराच्या बहुतांश भागांत अशा प्रकारे जाहिरातबाजी केली जात असल्याचे दिसून येते.

कॉलेजरोड परिसरातही झाडांना खिळे…
उच्चशिक्षित लोकांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणार्‍या कॉलेजरोड परिसरातील झाडांवरही खिळे ठोकून जाहिरातबाजी केल्याचे दिसून येते. मात्र, कोणीही यास विरोध तथा मनपा प्रशासनाकडे तक्रार करीत नसल्याने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना अभय मिळत आहे. आता मनपानेच कारवाईचा बडगा उगारून वृक्षांचा श्वास मोकळा करायला हवा.

हेही वाचा:

The post नाशिक : झाडांना खिळ्यांच्या वेदना, मनपा कारवाई करेना appeared first on पुढारी.