नाशिक : डिजिटायझेशनमुळे पतसंस्थांचा कारभार पारदर्शक – सहकारमंत्री अतुल सावे

sinner www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सहकारी संस्था कॉम्प्युटराईज्ड होत चालल्याने कारभार स्वच्छ व पारदर्शक होत आहे. बँकांप्रमाणे सहकारी संस्थांना सीबील लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चांगल्या कर्जदारांना न्याय देता येईल. बुडित कर्जांना आळा बसेल. वसुलीबाबत सुरळीत कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकार व सहकारी संस्था यांच्यामध्ये समन्वय नसल्याने अडचणी आहेत. त्या निश्चित दूर करू असे आश्वासन राज्याचे सहकार तथा इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थांचे फेडरेशनच्या उपकार्याध्यक्षपदी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आणि नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्थेचे फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष नारायण वाजे यांची निवड झाल्याबद्दल तसेच कार्याध्यक्षपदी अ‍ॅड. दीपक पटवर्धन, उपकार्याध्यक्षपदी अ‍ॅड. अंजली पाटील, स्वीकृत सदस्य नामकर्ण आवारे यांचा सत्कार ना. सावे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खा. हेमंत गोडसे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर माजी आमदार राजाभाऊ वाजे, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, भाजप उद्योग आघाडीचे राज्याध्यक्ष दीपक पेशकार, जिल्हाध्यक्ष विठ्ठलमामा जपे, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, भाजपचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड, जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे, सुनील बच्छाव, डॉ. सुनील ढिकले, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे, भारत कोकाटे, पतसंस्था फेडरेशनचे तालुकाध्यक्ष डॉ. जी. एल. पवार, युवा नेते उदय सांगळे, औरंगाबादचे माजी महापौर बापूसाहेब घडामोडे, सहायक निबंधक एकनाथ पाटील, श्रीमंत पतसंस्थेचे व्हा. चेअरमन अरुण वारुंगसे आदी उपस्थित होते.

डिजिटल व्यवहार करणार्‍या पतसंस्थांचे श्रेय त्यांनाच मिळावे यासाठी उपाययोजना करावी, वसुलीची किचकट प्रणाली सुटसुटीत करण्यासाठी नियमात बदल करावे लागतील. अधिकारी आणि पदाधिकारी यांना एकत्र बैठक घेऊन निश्चित मार्ग काढता येईल यावर सहकारमंत्री यांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन अ‍ॅड. पटवर्धन यांनी केले. सहकाराची आर्थिक नाडी जनतेपर्यंत जाते. सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम नारायण वाजे यांनी केले असून, ठेवीदारांचा विश्वास प्राप्त केला असल्याचे खासदार हेमंत गोडसे म्हणाले. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी प्रास्ताविक केले. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, जयंत आव्हाड यांची भाषणे झाली. अंबादास वाजे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी स्टाइसचे व्हा. चेअरमन सुनील कुंदे आदींसह तालुकाभरातील विविध पतसंस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी, पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सहकारी संस्था अधिक सक्षम करणार’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराचे महत्त्व ओळखून प्रथमच केंद्र सरकारमध्ये सहकार विभागाची निर्मिती करून देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे धुरा सोपविली, ना. शाह यांनी सहकारासाठी अनेक ऊर्जात्मक योजना राबविण्यास प्रारंभ केला असून येत्या काळात सहकारी संस्था अधिक सक्षम कशा होतील यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ना. सावे यांनी दिले.

ठेवींना संरक्षण मिळावे : वाजे
कुठल्याही क्षेत्रात काम करताना वारसा असला पाहिजे असे नाही. कोणतेही काम केले तर अवघड नाही. सर्वांच्या सहकार्याने माझी निवड झाली. काम करत असताना अडचणी येत असतात, आणि त्या कळतात. त्यातूनच मार्ग काढावा लागतो. ठेवींना संरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केल्यास मार्ग निघेल, त्यात सहकारमंत्री अतुल सावे यांनी लक्ष घालावे अशी मागणी नारायण वाजे यांनी सत्काराला उत्तर देताना केली.

हेही वाचा:

The post नाशिक : डिजिटायझेशनमुळे पतसंस्थांचा कारभार पारदर्शक - सहकारमंत्री अतुल सावे appeared first on पुढारी.