नाशिक : डीजेच्या तालावर ठेका धरत… गोविंदा पथकाने भरपावसात फोडली दहीहंडी

गोविंदा पथक www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

डीजेच्या तालावर धरलेला ठेका…’गोविंदा रे गोपाला’चा जयघोष आणि सुरू असलेला मुसळधार पाऊस अशा उत्साहपूर्ण वातावरणात तल्लीन झालेल्या गोविंदापथकाने पाच थरांची दहीहंडी फोडत जल्लोष साजरा केला. निमित्त होते गोकुळाष्टमीनिमित्त हिरावाडीतील कै. दत्ताजी मोगरे प्रणीत दुर्गा फ्रेंड सर्कलतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाचे. कमलनगर चौकात पार पडलेला उत्सव बघण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी भरपावसातही मोठी गर्दी केली होती.

गोकुळाष्टमीनिमित्त दुर्गा फ्रेंड सर्कलतर्फे दहीहंडीला फुला-माळांची आकर्षक सजावट करून आजूबाजूला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी दहीहंडी बघण्यासाठी आलेल्या परिसरातील बालगोपाळांनी डीजे साउंडवर लावलेल्या मराठी गीतांवर ठेका धरला होता. याचवेळी मुसळधार पावसाचे आगमन झाले. मात्र, अशाही वातावरणात चिंब भिजलेल्या गोविंदापथकाने जमिनीपासून पाच थर उंच उभारलेली दहीहंडी फोडण्याचा विक्रम केला. उपस्थित नागरिकांनीही भरपावसात थांबून ‘गोविंदा रे गोपाला’चा जयघोष करीत दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदापथकाला प्रोत्साहन दिले. या गोविंदापथकाला शिवसेना महानगर संघटक दिगंबर मोगरे, माजी नगरसेविका पूनम मोगरे यांच्यातर्फे अकरा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. हिरावाडी शिवजन्मोत्सव यात्रा समितीचे संस्थापक श्याम महाजन, प्रवीण महाजन यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. दरम्यान, कोरोना निर्बंधामुळे मागील दोन वर्षांपासून वेगवेगळ्या सण उत्सवांवर निर्बंध आल्याने कुठलेही उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत नसल्याने नागरिकही सहभागी होत नव्हते. मात्र, आता कोरोना संकट काही प्रमाणात दूर झाल्याने व शासनाने सण उत्सवाला परवानगी दिल्याने हिरावाडीत दहीहंडी सोहळा बघण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवसेना नेते जयंत दिंडे, माजी नगरसेवक मुकेश सहाणे आदींसह शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : डीजेच्या तालावर ठेका धरत... गोविंदा पथकाने भरपावसात फोडली दहीहंडी appeared first on पुढारी.