नाशिक : दागिने वापरताय, जरा सांभाळा..!

बनावट दागिने

नाशिक : एक शून्य शून्य : गौरव अहिरे

गेल्या काही दिवसांत शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चोर-भामट्यांनी ज्येष्ठ नागरिक, महिलांकडील सोन्याचे दागिने लंपास केले किंवा ओरबाडून नेले आहेत. यातील मोजकेच गुन्हे उघडकीस आले असून अद्यापही कित्येक तोळे सोन्याचे दागिने चोर भामट्यांकडेच आहे. त्यामुळे दागिने चोरट्यांच्या ताब्यात जाण्यापेक्षा स्वत:कडे सुरक्षीत ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दागिन्यांचा वापर करताना त्याच‌े प्रदर्शन होऊ नये याची काळजी स्वत:च‌ घेणे उचित ठरणार आहे.

शहरात काही दिवसांपूर्वी तासाभरात एका कारमधील भामट्यांनी दोन वृद्धांना लक्ष करीत त्यांच्याकडील दागिने ओरबाडून व हातचलाखीने चोरून नेले. नागा साधू बनून आलेल्या भामट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एकाकडील दागिने ओरबाडून नेले तर एकास आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने लबाडीने दागिने लंपास केले. त्याचप्रमाणे एका घटनेत तोतया पोलिसाने वृद्ध व्यक्तीकडील दागिने हातचलाखीने नेले, दुसऱ्या घटनेत दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने महिलेकडील दागिने नेेले. आणखी एका घटनेत पूजा विधी करण्याच्या बहाण्याने मातीच्या भांड्यात दागिने ठेवते असे सांगून एका महिलेने दोघांकडील सोन्याचे दागिने घेत पळ काढला. त्याचप्रमाणे सकाळी व सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून येत महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. यापैकी मोजकेच गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी काही सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. मात्र अद्यापही अनेक गुन्ह्यांची उकल झालेली नसून सोन्याचे दागिने चोर भामट्यांच्याच ताब्यात आहेत. नागरिकांच्या अज्ञानपणाचा, असहायतेचा, परिस्थितीचा किंवा बेसावधपणाचा गैरफायदा गुन्हेगार घेतात. काही क्षणात दागिने हिसकावून किंवा चलाखीने घेऊन ते पसार होतात. ही गोष्ट लक्षात येईपर्यंत काहीसा उशीर झालेला असतो. त्यामुळे गुन्हेगारांना पळून जाण्यास कालावधी मिळतो. त्यामुळे मौल्यवान दागिने चोर भामट्यांच्या हाती लागण्याआधीच नागरिकांनी खबरदारी, स्वयंशिस्त, सुरक्षीतता आणि सावधानता बागळणे महत्वाचे आहे. अनेकदा मॉर्निग वॉक किंवा रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी जाणारे नागरिक अंगावर दागिने घालून जात असतात. नेमके याच वेळी रस्त्यांवर गर्दी नसते, याचा फायदा चोर भामटे घेतात. त्याचप्रमाणे दागिने घातले तरी ते निर्मनुष्य ठिकाणी वावरताना झाकून ठेवणे कधीही फायदेशीर असते. सार्वजनिक ठिकाणी वावरताना वृद्ध व्यक्तींसोबत घरातील एखादी व्यक्ती असणे महत्वाचे आहे. अनोळखी व्यक्तीसोबत संवाद साधताना नागरिकांनी सुरक्षीत अंतर राखणे किंवा त्यांना आपल्या घरात, अंगणात प्रवेश देण्याचे टाळणे गरजेचे आहे. या खबरदारींमुळे दागिनेही सुरक्षीत राहतील व गुन्हे घडणार नाहीत. गेल्या काही घटनांमध्ये पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणल्यानंतर गुन्हेगारांकडून सोन्याचे दागिने विकत घेणाऱ्या काही सराफ व्यावसायिकांवरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांनाही दागिने विकताना अडचणी आल्यास ते हे गुन्हे करणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. अनेक गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार नवखे असले तरी ते सराईत गुन्हेगाराप्रमाणे निर्ढावलेले आढळून आले आहेत. त्यामुळे अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी पोलिसांच्या बंदोबस्त, कारवाईसोबतच नागरिकांनाही खबरदारी बाळगणे आवश्यक झाले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : दागिने वापरताय, जरा सांभाळा..! appeared first on पुढारी.