नाशिक : दीड तासाच्या पावसाने मनपाचे पितळ उघडे

नाशिकला पावसाने झोडपले,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर व परिसराला मंगळवारी (दि. 30) दुपारी दीड तास पावसाने झोडपून काढले. दुपारी 2.30 च्या सुमारास अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या गणेशभक्तांच्या आनंदावर पाणी फेरले गेले. दरम्यान, शहरात 28.4 मिमी पर्जन्याची नोंद झाली.

नाशिकमध्ये आठ दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला दणक्यात पुनरागमन केले. दुपारी 2.30 च्या सुमारास जोरदार पावसाला प्रारंभ झाला. काही वेळातच गंगापूर रोड, राजीव गांधी भवन, त्र्यंबक नाका यासह अन्य ठिकाणी सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले.

गणेशोेत्सवाच्या खरेदीसाठी सहकुटुंब घराबाहेर पडलेल्या नाशिककरांना या पावसाने गाठले. अचानक आलेल्या या पावसामुळे व्यापार्‍यांना फटका बसला. रस्त्यांवर छोट्या-मोठ्या वस्तू तसेच पूजेची साहित्य विक्री करणार्‍या विक्रेत्यांना पावसाने तडाखा दिला. ऐन उत्सवाच्या काळात पावसाने साहित्य ओले झाल्यामुळे काही विक्रेत्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. दुसरीकडे सिडको, सातपूर, नाशिकरोड तसेच पंचवटी परिसर व इंदिरानगर आदी उपनगरांमध्येही पावसाचा जोर होता. त्यामुळे उपनगरांमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, दीड तासाच्या पावसाने शहरातील काही भागात बत्तीगुल झाली. सायंकाळी उशिरापर्यंत काही ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

मनपाचे पितळ उघडे
गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. मात्र, दीड तासाच्या पावसाने मनपाच्या या कामावर पाणी फेरले जाऊन पुन्हा खड्डे निर्माण झाले. त्यामुळे महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी केलेल्या वरवरच्या मलमपट्टीचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले. ऐन गणेशोत्सवाच्या दिवशी गणेश मंडळांना शहरातील खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे. मनपालाही आता तातडीने पुन्हा खड्डे बुजवावे लागणार आहे.

The post नाशिक : दीड तासाच्या पावसाने मनपाचे पितळ उघडे appeared first on पुढारी.