नाशिक : दीड महिन्यात हटविले तब्बल ‘इतके’ अनधिकृत फलक

अनधिकृत फलक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महानगरपालिका हद्दीत वाहतुकीस अडथळा ठरणारे चौकाचौकांत लावण्यात आलेले अनधिकृत फलक हटविण्यात येत आहेत. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने आणि अतिक्रमण विभाग उपआयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभागीय अधिकारी यांच्या अधिपत्त्याखाली अतिक्रमण विभाग सातत्याने मोहीम राबवित आहेत. दीड महिन्यात मनपाचे सहा विभाग मिळून एकूण दोन हजार ३५२ फलक हटविण्यात आले आहेत. त्यामध्ये जाहिरात बोर्ड, होर्डिंग, पोल बॅनर, झेंडे, पोस्टर्स, स्टॅण्ड बोर्ड यांचा समावेश आहे.

मार्च महिन्यात सर्वाधिक ८४५ अनधिकृत फलक सातपूर विभागात, तर नाशिक पश्चिममध्ये सर्वांत कमी ४७ फलक हटविण्यात आले आहेत. तसेच १ ते १६ एप्रिल या पंधरवड्यात ५२१ अनधिकृत फलक हटविण्यात आले आहेत. त्यामध्ये नाशिक पूर्व मध्ये सर्वाधिक १२० फलक, तर नाशिक पश्चिम विभागात ३६ फलक हटविण्यात आले आहेत. संबंधित नागरिकांनी स्वत:हून अनधिकृत फलक, होर्डिंग काढून टाकावे अन्यथा अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उपआयुक्त (अतिक्रमण) करुणा डहाळे यांनी केले आहे.

कारवाई मात्र नाहीच

महापालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून अनधिकृत फलक हटविले जात असले तरी, संबंधितांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने फलक हटविण्याला अर्थच काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे फलक लावणाऱ्याचा हेतू साध्य झाल्यानंतर कारवाईचा फार्स केला जात असल्याने, ही कारवाई म्हणजे संबंधितांना अभय, अशीच असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. कारवाई कोणी करावी हाच पेच असल्याने अतिक्रमण विभाग आणि विभागीय अधिकारी केवळ एकमेकांवर ढकलाढकली करीत असल्याचे चित्र आहे.

विभागनिहाय कारवाई

नाशिक पूर्व – ९०

नाशिक पश्चिम – ४७

नाशिकरोड – ५५२

नवीन नाशिक – ९१

पंचवटी – २०६

सातपूर – ८४५

एकूण – १,८३१

(१ ते ३१ मार्चदरम्यान)

एप्रिलमधील कारवाई

नाशिक पूर्व – १२०

नाशिक पश्चिम – ३६

नाशिकरोड – ९५

नवीन नाशिक – ८६

पंचवटी – ६८

सातपूर – ११६

एकूण – ५२१

(१ ते १६ एप्रिलदरम्यान)

हेही वाचा : 

The post नाशिक : दीड महिन्यात हटविले तब्बल 'इतके' अनधिकृत फलक appeared first on पुढारी.