नाशिकमध्ये ‘मे’ च्या पहिल्या शनिवारपासून पाणीकपात?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल निनोमुळे पाऊस लांबल्यास नाशिककरांना किमान ३० ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी पुरेल या दृष्टिकोनातून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून एक दिवस पाणी बंद करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार होता. मात्र, हा निर्णय लांबल्याने आता मे महिन्याच्या पहिल्या शनिवारपासून पाणीकपातीबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून पाणीकपातीबाबतचे नियोजन केले जात असून, ३० ऑगस्टपर्यंत हे नियोजन केले जाण्याची शक्यता आहे.

येत्या जून महिन्यात दक्षिण प्रशांत महासागारात अल निनो वादळ आल्यास पाऊस लांबण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेत राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांना पत्र देत संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी एप्रिल महिन्यापासून आठवड्यातील एक दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद, तर जून-जुलै महिन्यात आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबत आराखडा तयार केला होता. या आराखड्याचे शासनाने कौतुकदेखील केले होते.

त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांकडे याबाबतची बैठक घेण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव बैठक होऊ शकली नसल्याने पुन्हा निर्णय लांबणीवर पडला. त्यातच ठाकरे गटासह इतर राजकीय पक्षांकडून या निर्णयाला विरोध केला गेल्याने, महापालिका प्रशासनाने सावध भूमिका घेत याबाबतचा निर्णय शासनस्तरावरच घेतला जावा, अशी भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने पाणीकपातीबाबतचा आराखडा शासनाला सादर करीत पुन्हा एकदा मार्गदर्शन मागविले होते. मात्र, अशातही यावर निर्णय होऊ शकला नाही. अखेर शासनाने याबाबतचा चेंडू महापालिका आयुक्तांच्याच पारड्यात ढकलला असून, लवकरच यावर निर्णयाची शक्यता आहे. दरम्यान, वादळाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाला पाणीकपातीशिवाय गत्यंतर नसल्याने मेच्या पहिल्या शनिवारपासून पाणीकपातीचा निर्णय लागू केला जाण्याची शक्यता आहे.

२०१६, २०१९ मध्ये पाणीबाणी

२०१६ आणि २०१९ मध्ये पाणी कपातीबाबतचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. २०१६ मध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने आठवड्यातून एक दिवस पाणीकपात, तसेच शहरातील सर्वच भागांत केवळ एकच वेळा पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. तर २०१९ मध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याबाबत निर्णय घेतला होता. आता २०२३ मध्ये ही वेळ उद्भवली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये 'मे' च्या पहिल्या शनिवारपासून पाणीकपात? appeared first on पुढारी.