नाशिक : विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन भोवले, आश्रमशाळेचा अधीक्षक निलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आदिवासी विद्यार्थिनीसोबत लैंगिक गैरवर्तन केल्याप्रकरणी भुवन येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे अधीक्षक राहुल सुरेश तायडे यांचे सोमवारी (दि.१७) नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जितीन रहमान यांनी निलंबन केले. तसेच तायडे याचा पदभार तत्काळ आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकाकडे सोपविण्याच्या सूचनाही रहमान यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. तायडे यांच्या निलंबनाने आश्रमशाळा तसेच वसतिगृहांच्या अधीक्षकांचे धाबे दणाणले आहे.

आदिवासी विकास विभागाची भुवन येथे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा असून, तिथे राहुल तायडे अधीक्षक (पुरुष) या पदावर कार्यरत होता. गेल्या आठवड्यत तायडे याने इयत्ता सातवीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींसोबत लैंगिक चाळे केले होते. या प्रकरणी नाशिक प्रकल्प कार्यालयाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर रविवारी (दि.१६) चौकशी समितीसह सहायक प्रकल्प अधिकारी स्नेहल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशाखा समितीने पीडितेची भेट घेऊन जबाब घेतला.

सोमवारी (दि.१७) चौकशी समितीने अहवाल नाशिक प्रकल्प अधिकाऱ्यांना सादर केला. या अहवालात अधीक्षक तायडे याने पीडितेसाेबत लैंगिक गैरवर्तन केले. त्यामुळे शाळेची प्रतिमा मलिन झाली असून, गुरू-शिष्य नात्याला काळिमा फासल्याचे म्हटले आहे. समितीने शिस्तभंगाच्या कार्यवाहीची शिफारस केल्याने तायडेचे निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान, बालकल्याण समितीने पीडितेची भेट घेऊन जबाब घेतला. तसेच पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सूचना केली.

आदिवासी विद्यार्थिनंवर लैंगिक अत्याचार होणे ही गंभीर बाब आहे. ही घटना ताजी असतानाही महिला अधीक्षका विनापरवानगी रजेवर आहे. या प्रकरणी त्यांच्यावरही कारवाई होण्याची गरज आहे.
– गणेश गवळी, युवा राज्य कार्याध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास

हेही वाचा : 

The post नाशिक : विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन भोवले, आश्रमशाळेचा अधीक्षक निलंबित appeared first on पुढारी.