वाराणसी, प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकच्या विकासाचा प्रयत्न

अभ्यास दौरा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका अधिकाऱ्यांनी दि. १४ ते १६ एप्रिल या तीन दिवसांत वाराणसी, प्रयागराज शहरांना भेट देऊन तेथील विकासकामांची पाहणी केली.

‘नमामि गंगा’च्या धर्तीवर नाशिकमध्ये राबविण्यात येणारा ‘नमामि गोदा’ प्रकल्प आणि २०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेशातील या दोन शहरांमधील विकासकामांची, तंत्रज्ञानाची, दळणवळण, स्वच्छता, मलशुद्धीकरण प्रकल्प यांची माहिती घेतली. तसेच ‘नमामि गंगा’ प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉर, नदीकाठचा विकास (रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट), नमो घाट, गंगा आरती याची माहिती घेत, या दोन शहरांच्या धर्तीवर नाशिकचा विकास करण्याचा मनोदय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

दौऱ्यात राष्ट्रीय हरित लवादाचे नियम पाळून गॅबियन वॉल आणि दगडी बांधकाम यांचे मिश्रण करून नमो घाट निर्माण करण्यात आलेला आहे. ही विशेष बाब पाहण्यात आली. नमो घाटासह राज घाट, मणिकर्णिका, जठार घाट, भोसले घाट, सिंधिया घाट, संकठा घाट यांचीही पाहणी केली. तसेच शहरातील दळणवळणाची व्यवस्था सुधारण्याकामी रस्त्याचे आवश्यक रुंदीकरण, दुभाजक टाकणे या कामांचीही पाहणी केली. प्रदूषण कमी करण्यासाठी या शहरांमध्ये ई-रिक्षाच आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने डस्टबिन, निर्माल्य कुंड यांचीही पाहणी केली. तसेच प्रयागराजमधील नैनी भागातील फूड चेन रिऍक्टर तंत्रज्ञानावर आधारित मलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली असता कोणत्याही प्रकारचा वास येत नसल्याचे आढळले.

वाराणसी आणि प्रयागराजमधील चांगल्या उपक्रमांची नाशिक शहरात कशी अंमलबजावणी करता येईल, याबाबत तेथील क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नदीचे पुनरुज्जीवन या मुद्द्याच्या दृष्टीनेही अधिकाऱ्यांच्या टीमने माहिती घेतली. मनपाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, संदेश शिंदे, गणेश मैड, बाजीराव माळी आणि ‘नमामि गोदा’ प्रकल्पाची सल्लागार कंपनी ‘अलमन्डझ’चे प्रतिनिधी जितेंद्र हटवार, नाझीर हुसेन यांचा या दौऱ्यात समावेश होता.

गंगेच्या धर्तीवर गोदावरीची स्वच्छता

गंगा घाटाची दिवसातून तीन वेळा स्वच्छता केली जाते. निर्माल्याची विल्हेवाट कशी लावली जाते, याबाबतही अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. गंगा नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी नाल्यांचे सांडपाणी अडविण्यात आणि वळविण्या आले आहे. त्यासाठी उभारलेल्या चारपैकी नगावा येथील ५० एमएलडीचे सिव्हेज पंपिंग स्टेशन आणि रमणा येथील ५० एमएलडीचे मलशुद्धीकरण केंद्र यांना भेट देऊन अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाची माहिती घेतली. तिसऱ्या दिवशी प्रयागराजला भेट देऊन साधुग्राम ले आउट, यमुना-गंगा संगम येथील विकासकामांची पाहणी करून क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

हेही वाचा :

The post वाराणसी, प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकच्या विकासाचा प्रयत्न appeared first on पुढारी.