नाशिक : दुगारवाडीला पर्यटकांवर लक्ष ठेवायचे कोणी?

दुगारवाडी धबधबा

ञ्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

पावसाळा सुरू झाला तसा दुगारवाडी धबधबा हौशी पर्यटकांना आकर्षीत करत आहे. मात्र येथे दरवर्षी अती उत्साही पर्यटक बळी जातात. याकडे वनखाते आणि पोलीस प्रशासन यांचे दुर्लक्ष झाले आहे. शनिवारी आणि रविवारी गर्दी असते तशी गर्दी आता सुटी नसतानाही असल्याचा प्रत्यय दररोज येत आहे. रविवारी (दि.16) तर सायंकाळपर्यंत शेकडो हौशी पर्यटक येथे येत होते. यामध्ये मद्यपान करण्यासाठी आलेली तरूणाई तसेच कुटुंबासह येणारेही होते.

सापगाव सोडल्यानंतर जेथे वन विभागाने चेकपोस्ट केले आहे त्याच्या अलीकडे खासगी वाहनतळ थाटण्यात आले आहे. या वाहनतळावर सातत्याने पर्यटक आणि तेथे पार्कींग फी वसूल करणारे यांचा वाद होताना दिसताे. अवास्तव पार्कींग फी घेणे, दादागिरी करणे असे प्रकार घडतात. यामध्ये तेथे असलेल्यांची आरेरावीही संघर्षाचे कारण ठरते. त्यानंतर वनविभाग स्थानिक वन व्यवस्थापन समिती 30 रूपये प्रवेश फी घेऊन पुढे सोडले जाते. दुगारवाडी धबधब्याकडे जाण्याचा मार्ग असा फलक सापगाव फाटा ते वनविभागाचे चेकपोस्ट येथपर्यंत आढळत नाही. नवखे असलेले निम्मे अधिक पर्यटक थेट कळमुस्ते रस्त्याने पुढे जातात. दुगावाडी धबधबा जेथून पहावयास मिळतो तेथपर्यंत ठिक आहे. मात्र टेकडी उतरून धबधब्याकडे जाण्याचे साहस जीवावर बेतल्याच्या घटना दरवर्षी घडलेल्या असताना त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. विशेष म्हणजे वन खात्याने याबाबत दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समिती केवळ पैसे कमावण्यात धन्यता मानते की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या गोष्टींची गरज

कोणतीही माहिती नसताना पर्यटक टेकडी उतरून नदीपात्र ओलांडतात. बहुतेकांना हे माहित नसते की कळमुस्ते शिवारात पाऊस होतो तेव्हा या धबधब्याचा जोर वाढतो. नदी प्रवाहात अचानक पाण्याची पातळ वाढते, प्रवाहाचा वेग वाढतो आणि तो ओलंडणे अशक्य होते. दुपारी आलेले पर्यटक सायंकाळपर्यंत धबधब्याजवळ पोहचतात आणि परत फिरताना त्यांना अंधार होतो. गत वर्षी शंभर दिडशे पर्यटक असेच अडकून पडले होते. त्यातील काहींनी येण्याचा प्रयत्न केला. त्यात एक व्यक्ती वाहुन गेला. अशा दुर्घटना दरवर्षी घडत आहेत व येथून पुढे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन खात्याने येथे कोणतेही सूचना फलक लावलेले नाही. धोकेदायक ठिकाणांची माहिती दिलेली नाही. किंबहुना पावसाचा जोर असताना धबधब्याकडे जाण्याचा प्रकार बंद करण्याची दक्षता घ्यायला हवी. इतर वेळी नदी प्रवाह ओलांडताना दोर साखळी यासारखे आधाराला रेलींग करण्याची गरज आहे.

टेकडी उतरण्यास बंदी घाला

गेल्या वीस वर्षांपासून दुगारवाडी धबधबा प्रसिद्धीस आला. त्यानंतर सातत्याने अपघात घडले मात्र आजपर्यंत येथे सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेतलेली दिसत नाही. पैसे आकारण्यास मात्र सुरूवात केली आहे. पार्कींग फी आणि प्रवेश फी भरणाऱ्या पर्यटकांना हे पर्यटनस्थळ निर्धोक आहे, सुरक्षीत आहे या भावनेने बेसावध ठेवले जात आहे. शनिवार, रविवार आणि पावसाळ्यात येथे सुरक्षारक्षक, मागदर्शक नेमण्याची गरज आहे. तसेच किमान 15 जुलै ते 15 आगॅस्ट पावसाचा जोर अधिक असतो तेव्हा टेकडी उतरण्यास व नदीप्रवाह ओलांडून धबधब्याकडे जाण्यास बंदी घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

 

The post नाशिक : दुगारवाडीला पर्यटकांवर लक्ष ठेवायचे कोणी? appeared first on पुढारी.