जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

टँकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा बसायला सुरुवात झाली आहे. ग्रामीण जनतेची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. सद्यस्थितीत तीन तालुक्यांमध्ये 17 टँकरच्या सहाय्याने 36 हजार 374 व्यक्तींना पाणीपुरवठा केला जात आहे.

वाढत्या उन्हाच्या कडाक्यासह ग्रामीण भागातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटायला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम ग्रामीण जनजीवनावर होत आहे. महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. पाण्यासाठी ग्रामीण भागातून मागणी होताच टँकर सुरू केले जात आहेत. जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत तीन तालुक्यांमध्ये टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे. येवल्यात सर्वाधिक 13 टँकर सुरू आहेत. या टँकरच्या सहाय्याने 19 गावे व 17 वाड्यांमधील एकूण 24 हजार 178 ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. चांदवडमध्ये 3 टँकरच्या सहाय्याने सहा गावे-वाड्यांतील 11 हजार 10 व्यक्तींना पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय बागलाणमधील दोन गावांतील 1,186 नागरिकांना एका टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. प्रशासनाने प्रत्यक्षात टँकरच्या 28 फेर्‍या मंजूर केल्या असताना, सध्या 29 फेर्‍या होत आहेत. वाढत्या उन्हासोबत येत्या काळात टँकरच्या संख्येत वाढ होणार आहे.

हेही वाचा:

The post जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा appeared first on पुढारी.