नाशिकच्या निओ मेट्राे प्रकल्पाचा आज दिल्ली दरबारी फैसला

निओ मेट्रो

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र शासनाच्या शहरे विकास मंत्रालयाकडे गेल्या दाेन वर्षांपासून नाशिकच्या निओ मेट्राे प्रकल्पाचा प्रस्ताव पडून आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत निओबाबत वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर आता बुधवारी (दि.१५) दिल्ली दरबारी निओ मेट्रोचा अंतिम फैसला हाेणार आहे. बैठकीला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनादेखील आमंत्रित करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील पहिली टायरबेस ‘मेट्रो निओ’ नाशिकला सुरू करण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली होती. या प्रकल्पासाठी महारेल आणि सिडको यांच्या माध्यमातून नाशिकमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. मेट्रो निओ प्रकल्पांतर्गत दोन टप्पे राहणार आहेत. स्थानके, शेड यासाठीच्या जागाही निश्चित झाल्या असून, केंद्रीय अर्थसंकल्पात मेट्रोसाठी २०२४ काेटींची तरतूदही करण्यात आली होती. त्यानंतर मात्र या प्रकल्पाकडे महापालिकेसह राज्य आणि केंद्र शासनाकडूनही दुर्लक्ष झाल्याने प्रस्ताव दिल्ली दरबारीच पडून होता. यामुळे प्रकल्प कधी सुरू हाेणार याविषयी गूढच होते. नाशिकमध्ये दोनदिवसीय भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठक झाली. या बैठकीच्या समारोपाप्रसंगी ना. फडणवीस यांनी निओ मेट्राेचे एकसमान माॅडेल लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

नाशिकच्या मेट्रोचा प्रस्ताव सादर झाला तेव्हा देशाच्या अन्य भागातूनही मेट्रोसह अन्य प्रस्ताव सादर झाले. त्यामुळे पंतप्रधानांनी सर्वच प्रस्तावांचा अभ्यास करून देशभरासाठी एकच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिल्याचे ना. फडणवीस यांनी सांगत देशभरात एकसमान मेट्रो प्रकल्प उभारला जाणार असल्याचे नमूद केले. संपूर्ण प्रकल्प ‘मेक इन इंडिया’ असेल आणि त्याचे सुटे भागही भारतातच मिळणार आहेत. आता फडणवीस यांनी प्रदेश कार्यकारिणीत निओ मेट्रोविषयी वक्तव्य केल्यानंतर नाशिककरांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या असून, केंद्र शासनाने मेट्राे सादरीकरणासाठी बैठक बाेालवली आहे. बैठकीत देशातून आलेल्या सर्व प्रस्तावांचे सादरीकरण करून एकच माॅडेल ठरविले जाणार आहे.

महापालिका देणार केवळ जागा

निओ मेट्राेसाठी महापालिकेने आर्थिक भार न उचलता केवळ जागा उपलब्ध करून देणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. यामुळे केंद्र आणि राज्य शासन तसेच महारेल यांनाच आर्थिक भार उचलावा लागणार आहे. प्रकल्पातील टायरबेस एका बसची लांबी २५ मीटर असेल. २५० प्रवासी क्षमता असून, काही ठिकाणी ही जाेडबस ओव्हरहेड वायरद्वारे इलेक्ट्रिकवर चालण्याची व्यवस्था असेल. नाशिकच्या मेट्रोसाठी ३१ किमी लांबीचे दोन एलिव्हेडेट मार्ग असतील. येत्या चार वर्षांत प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. प्रकल्पासाठी २१००.६ कोटी खर्च येणार आहे. केंद्र सरकारकडून या प्रकल्पाकरता ७०७ कोटी रुपये मिळणार आहेत. ११६१ कोटींचे कर्ज उभारावे लागणार आहे.

मेट्रोचा असा असेल मार्ग

मेट्रो निओसाठी पहिला एलिव्हेटेड कॉरिडोर १० किमी लांबीचा आहे. या मार्गावर गंगापूर, जलालपूर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजीनगर, पंचवटी, सीबीएस, मुंबई नाका अशी १० स्थानके असतील. दुसरा कॉरिडोर २२ कि.मी असेल. त्यात गंगापूर गाव, शिवाजीनगर, श्रमिकनगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा कॉर्नर, व्दारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्त मंदिर, नाशिकरोड अशी स्थानके असतील. मेट्रोसाठी एकूण २९ स्थानके असतील.

The post नाशिकच्या निओ मेट्राे प्रकल्पाचा आज दिल्ली दरबारी फैसला appeared first on पुढारी.