अजित दादांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले : दादा भुसे

दादा भुसे, अजित पवार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले. त्यांनी स्वत:मधील धडाकेबाजपणा कमी ठेवला असता, तर आज ही परिस्थिती ओेढवली नसती, अशा शब्दांत बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी पवार यांच्यावर टीका केली. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.३०) ना. भुसे यांनी ‘शासन आपल्या दारी योजने’चा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या वर्षपूर्तीनिमित्त ना. पवार यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात पवार यांनी, ना. शिंदे हे राज्यातील सर्वात अपयशी मुख्यमंत्री असल्याची टीका केली, त्याबद्दल ना. भुसे यांना विचारण्यात आले होते. पवार यांचे वक्तव्य नैराश्यातून उमटले असल्याची प्रतिक्रिया ना. भुसे यांनी दिली. एक व्यक्ती म्हणून पवार यांचे काम धडाकेबाज आहे. मात्र, सत्तेत असताना आम्हाला त्यांनी दूर लोटले. त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप ना. भुसे यांनी केला.

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे मुंबई यांच्या महापालिका मोर्चाबाबत बोलताना ना. भुसे यांनी, मागील विषयांमधील चाैकशांवरून लक्ष विचलित करण्यासाठी मोर्चाचे आयोजन केल्याची टीका केली. चाैकशीतून योग्य ती माहिती समोर येईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, मालेगावमध्ये रविवारी (दि. २) हिंदू संघटनांनी पुकारलेल्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना लोकशाहीत सर्वांना मोर्चाचे अधिकार आहे. मालेगावचा हिंदू समाज हा नेहमीत योग्य भूमिका पार पाडत असतो, असेही ना. भुसे यांनी सांगितले.

कारवाई करणार

नाशिकमध्ये झळकलेल्या गुलशनाबाद नावाच्या फलकांवरून ना. भुसे यांनी संताप व्यक्त केला. ज्या कोणी हे कृत्य केले असेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच लोकप्रतिनिधी व पोलिस विभागाशी चर्चा सुरू आहे. राज्याच्या विकासात बाधा आणणाऱ्या अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यात येईल, असा इशारा भुसे यांनी दिला.

हेही वाचा :

The post अजित दादांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले : दादा भुसे appeared first on पुढारी.