खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे Raosaheb Danve

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा

पहाटेच्या शपथविधीवर कोणी कोणाची विकेट घेतली यावर चर्चा सुरू असतानाच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील यात उडी घेतली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नाशिक येथील संयुक्त मोर्चा संमेलनात माध्यमांशी बोलताना दानवे यांनी काल-परवा शरद पवार यांनी सत्तेसाठी आम्ही सरकार पाडले, असे म्हटले पण तसे बघितले तर त्यांनी वसंतदादांचे सरकार का पाडले ? तेव्हा ते पण सरकारमध्ये होते ना. मी स्वतः २८ वर्षे आमदार-खासदार होतो, तेव्हा कधी सत्तेत नव्हतो मात्र आता आम्ही खऱ्या शिवसेनासोबत गेलो आणि सरकार स्थापन केले आहे, असे वक्तव्य यावेळी दानवे यांनी केले.

शहरात झालेल्या संयुक्त मोर्चा संमेलनात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, शहराध्यक्ष गिरीश पालवे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यमंत्री दानवे यांनी, एखाद्या निवडणुकीत पराभव झाल्यावर कार्यकर्ते तसेच जनता म्हणते की, आम्ही खऱ्या अर्थाने काम केले पण लोकांना पटवून देऊ शकलो नाही. ही वेळ भविष्यात यायला नको म्हणून असे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहे. काँग्रेसने निवडणुका जिंकण्यासाठी गरिबी हटावचा नारा दिला होता. त्यामुळे लोकांनी पंजाला मतदान केले. काँग्रेसचे सरकारदेखील आले पण गरिबी मात्र गेली नव्हती, हेच गरीब २०१४ ला एकत्र आले आणि त्यांनी मोदींना निवडून दिले. देशातील जवळपास ४० टक्के लोकांनी बँकेचे तोंडही बघितले नव्हते. मात्र, मोदींनी जनधन अकाउंट काढले त्यात २० कोटी महिलांनी खाते उघडले.

उद्धव ठाकरे यांना शेतकरी भेटले त्यांनी नुकसान झाले आहे, काही मदत करा म्हणून सांगितले. तेव्हा ठाकरे माझे कुटुंब माझी जबाबदारी असे म्हणायचे. त्यामुळे लोकांना कळून चुकले होते हे मोदी कुठे आणि उद्धव ठाकरे कुठे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर यावेळी टीकादेखील त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरू आहेत. मोदींचे तसेच भारताच्या लोकशाहीचे कौतुक बाहेरच्या देशातील जनता करत आहे. काँग्रेसचे राहुल गांधी लंडनला जाऊन भारताची लोकशाही धोक्यात असे सांगताना देशाचे वाभाडे काढत आहेत. जगात अमेरिकेची अर्थव्यवस्था धोक्यात आहे. पाकिस्तानमध्ये कशी अराजकता माजली हे जग बघतंय. मजबूत माणूस नाही म्हणून त्या लोकांचे दिवाळे निघाले. जगाच्या पाठीवर भारतासारखा चांगला देश नाही, दोन्ही सरकारमधील फरक लोकांना सांगायला पाहिजे असेदेखील ते म्हणाले.

यावेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी, उद्धव ठाकरे यांनी मोदींचा अपमान केला होता. त्या अपमानाचा बदला देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याचे सांगितले तसेच मोदी नसते तर भारताची स्थिती पाकिस्तान आणि श्रीलंकेसारखी झाली असती. जगातले सर्वांत मोठी पार्टी ही भारतीय जनता पार्टी आहे. काश्मीरच्या प्रश्नाबाबत रक्ताचे पाट वाहतील, अशा चर्चा होत्या मात्र एक थेंब रक्ताचा पडला नाही, काश्मीरमध्ये ३७० हटविले. तसेच मी पण राममंदिराच्या आंदोलनासाठी गेलो होतो, लवकरच राममंदिर होईल, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.

चर्चा भुजबळांच्या नाशिक फेस्टची

यावेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नाशिकमध्ये नाशिक फेस्टिव्हल होणार आहे, गोल्फ क्लब मैदानावर हे भरणार असल्याचे जाहीर केले आणि लगेचच उपस्थितांना माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भरविलेल्या नाशिक फेस्टिव्हलची आठवण झाली आणि चर्चा झडायला सुरुवात झाली. त्यामुळे भुजबळांच्या नाशिक फेस्टिव्हलवर भाजपचा डोळा तर नाही, असादेखील एक सूर त्यामध्ये होता.

हेही वाचा : 

The post खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे appeared first on पुढारी.